मुळच्या विदर्भातल्या असलेल्या जिल्हाधिका-यांचा राष्ट्रीय विक्रम
मेघना ढोके
नाशिक-दि. 6 - देशाच्या अतीपूर्वेला भारत-बांग्लादेश सीमेवर असलेल्या त्रिपुरातल्या अतीदुर्गम ढलाई जिल्ह्यानं मनरेगाच्या कामात एक नवा विक्रम करुन दाखवला आहे आणि या विक्रमाचे मानकरी आहेत त्रिपुराचे जिल्हाधिकारी डॉ.संदीप राठोड. ते मुळचे विदर्भातल्या पुसद जिल्ह्यातले, मात्र प्रशासकीय सेवेत त्यांनी आपल्या कर्तबगारीनं त्रिपुरा आणि ढलाई जिल्ह्याला देशात एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.
त्रिपुरातल्या केवळ शेतीवर जगणा-या समाजव्यवस्थेत मनरेगानं स्थानिकांना जगण्याचं एक साधन मिळवून दिलं आहे. अत्यंत दुर्गम भाग, दळणवळणाची साधनं कमी आणि रोजगाराची साधनं दुर्मिळ. त्यामुळे अतीगरीब आणि मागास लोकांपर्यंत मनरेगा पोहचवून त्याची उत्तम अमलबजावणी हेदेखील एक आव्हान होतं. मात्र ते आव्हान पेलत देशभरातील 688 जिल्ह्यातून मनरेगाच्या सर्वोत्कृष्ट कामाचा पुरस्कार ढलाई जिल्ह्यानं मिळवला. देशभरात सर्वाधिक मनुष्यदिवस काम देण्याची नोंद या जिल्ह्याच्या नावावर करण्यात आली आहे. 2014-15 या आर्थिक वर्षात प्रत्येक घरटी 98.79 टक्के दरानं 74.65 लाख मनुष्यदिवस काम ढलाई जिल्ह्यात देण्यात आलं. मनरेगाच्या नियमाप्रमाणं मागितलं तर 100 दिवस कामाची हमी आहे, त्यानुसार शेकडा 98 टक्के म्हणज 98 दिवसाहून अधिक काम या जिल्ह्यात मनरेगाच्या योजनांतर्गत करण्यात आलं.
नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात केंद्रिय ग्रामीण विकास मंत्री चौधरी बिरेंद्र सिंग यांच्या हस्ते डॉ. राठोड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. भारत-बांग्लादेश सीमेजवळ असलेला हा दुर्गम जिल्हा. बांधाला बांध असावा तशी बॉर्डरला बॉर्डर चिकटून आहे. या जिल्ह्यातच असलेलं चंदननगर हा वादग्रस्त भूभाग आता नव्या भारत-बांग्लादेश करारानुसार भारतात दाखल झाला. अशा अतीमहत्वाच्या या जिल्हयात महाराष्ट्रातून 2009 साली थेट रिक्रूट झालेले डॉ. राठोड कार्यरत आहेत. बंगाली भाषेत उत्तम संवाद साधत ते स्थानिकांशी थेट संवाद साधतात. छोटय़ामोठय़ा गावासह सीमा सुरक्षा बलाच्या सीमेवर कार्यरत तुकडय़ांशी त्यांचा चांगला संपर्क असतो. देशाच्या एका टोकाला असलेल्या या जिल्हयातही उत्तम काम होऊ शकतं, आणि तुटलेपणाची भावना असलेली ही गावं, इथली माणसं मुख्य प्रवाहातल्या विकास योजनांचे लाभ मिळवू शकतात हे डॉ. राठोड यांनी दाखवून दिलं आहे.