कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रिया रविवारी पूर्ण झाली़ गेले नऊ दिवस सुरू असलेली ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे़ देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन गुरुवारी (दि़ ६) दुपारपासून सुरू होणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ़ अमित सैनी यांनी रविवारी दिली़ अंबाबाईच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रि येकडे संपूर्ण देशभरातील भाविकांचे लक्ष लागून राहिले होते़ केंद्रीय पुरातत्त्व खात्याचे अधिकारी मनेजर सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २५ जुलैला संवर्धन प्रक्रिया सुरू केली होती़रविवारी मूर्तीला दूर्वारसाचा लेप देऊन ही प्रक्रिया पूर्ण झाली़ प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रविवारी जिल्हाधिकारी डॉ़ सैनी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ देवानंद शिंदे यांनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची पाहणी केली़ पाहणीनंतर डॉ़ सैनी पत्रकारांशी बोलत होते़ डॉ़ सैनी म्हणाले, अंबाबाईच्या मूर्तीवरील संवर्धन प्रक्रियेदरम्यान काढण्यात आलेली मूर्तीची छायाचित्रे, संवर्धनादरम्यान आलेल्या समस्या, नकाशे, प्रत्येक टप्प्यावर करण्यात आलेल्या रासायनिक प्रक्रियेचा तपशील, संवर्धनानंतर घ्यावयाची दक्षता, आदींची माहिती असलेली सीडी पुरातत्त्व खात्याचे अधिकारी मनेजर सिंग यांनी देवस्थान समितीकडे सोपविली आहे़ या प्रक्रियेबाबतची लेखी माहितीही ते लवकरच देणार आहेत़ ही माहिती गोपनीय स्वरूपाची असून ती देवस्थान समितीच्या ताब्यात राहणार आहे़ यातील काही भाग श्रीपूजकांना देण्यात येणार आहे़ मंदिरातील अन्य प्राचीन मूर्तींवरही रासायनिक संवर्धन प्रक्रियेबाबतही विचार करण्यात येणार आहे़ अंबाबाईच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेबाबत आम्ही खूप समाधानी आहोत. संवर्धन प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती शुक्रवारी (दि. ७) पत्रकार परिषदेत देण्यात येणार आहे़, अशी माहिती डॉ़ सैनी यांनी दिली़ यावेळी देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)दूर्वारसाच्या लेपाने सुकविली मूर्तीदिवसातून तेरा तास काम करीत अंबाबाईच्या मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण केली़ संवर्धनाच्या कामादरम्यान खूप चांगला अनुभव आला़ या प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी रविवारी मूर्तीवर दूर्वारसाचा लेप लावून मूर्ती सुकविण्यात आली़ मूर्ती खूप छान दिसत आहे़ संवर्धन प्रक्रियेचा लिखित स्वरूपातील अहवाल देवस्थान समितीला चार दिवसांत देणार आहे़, पुरातत्त्व खात्याचे अधिकारी मनेजर सिंग यांनी सांगितले.
अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन येत्या गुरुवारपासून
By admin | Published: August 02, 2015 11:56 PM