मुंबई: कोरोनाचा महत्त्वाचा टप्पा सुरू झाला असून पुढील १५ दिवस महत्त्वाचे आहेत. त्यामुळे घरीच राहा, अनावश्यक गर्दी टाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. अत्यावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय अतिशय धाडसी आहे. मात्र तुमच्यावर विश्वास ठेऊन मी हा निर्णय घेतला आहे, असंदेखील मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाचा अतिशय महत्त्वाचा टप्पा सुरू झाला असून येत्या काही दिवसांत कोरोना गुणाकार करण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळातही आपण अन्नधान्याची दुकानं २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तुमच्यावर विश्वास दाखवून घेतला आहे. गर्दी टाळण्याच्या हेतूनं हे पाऊल उचलण्यात आलं आहे. त्यामुळे कृपया दुकानांमध्ये गर्दी करू नका, असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं.
CoronaVirus: कोरोना गुणाकार करण्याची शक्यता, पुढील १५ दिवस महत्त्वाचे- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 9:08 PM