- पूजा दामले, मुंबईबारमाही सूर्यप्रकाश मिळणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. देशातील हवामान हे आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहे. पण गेल्या तीन वर्षांमध्ये सुमारे १५ लाख व्यक्तींवर केलेल्या अभ्यासातून असे समोर आले आहे की, देशातील १० पैकी ७ व्यक्तींमध्ये जीवनसत्त्वांची कमतरता आहे. महत्त्वाचे म्हणजे मुंबईसह राज्याचा समावेश असलेल्या पश्चिम विभागातील ८०.३० टक्के लोकांमध्ये जीवनसत्त्वाचा अभाव असल्याचा निष्कर्ष अभ्यासांती काढण्यात आला आहे.गेल्या तीन वर्षांमध्ये या अभ्यासासाठी १४ लाख ९६ हजार ६८३ लोकांची जीवनसत्त्वाची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीमध्ये ड जीवनसत्त्व, बी १२ जीवनसत्त्व आणि बी ९ जीवनसत्त्वाची (फॉलिक अॅसिड) तपासणी करण्यात आली होती. हा अभ्यास देशाच्या उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम विभागांमध्ये करण्यात आला होता. या चारही विभागांचा एकत्रित अभ्यास केल्यावर ७५ टक्के लोकसंख्येमध्ये जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले होते. जीवनसत्त्वाचा मेट्रोपॉलिसने केलेल्या अभ्यासात, ८१.२८ टक्के नमुन्यांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले. तर २१.०२ टक्के नमुन्यांमध्ये बी १२ जीवनसत्त्वाची आणि १५.०६ टक्के नमुन्यांमध्ये बी ९ जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. सोनाली कोल्ते यांनी सांगितले की, भारतीय लोक हे जीवनसत्त्वांकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. जीवनसत्त्वे एकदम कमी होत नाहीत. ही प्र्रक्रिया कित्येक महिने आणि वर्षांपासून हळूहळू घडत असते. शरीरातील जीवनसत्त्वे कमी झाल्यावर त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. पण वेळीच जीवनसत्त्वांच्या कमतरतेचे निदान झाल्यास लक्षणांवर नियंत्रण आणता येते. त्यामुळे पुढे होणारी आरोग्याची हानी टाळता येते.२० ते ४० वयोगटातील व्यक्तींमध्ये सर्वच जीवनसत्त्वांची कमतरता असल्याचे प्रमाण अधिक आहे, असाही हा अभ्यास म्हणतो. या वयोगटातील व्यक्तींमध्ये ड जीवनसत्त्व कमी असण्याचे प्रमाण ८३.५० टक्के इतके आहे, तर २१.६८ टक्के व्यक्तींमध्ये बी १२ जीवनसत्त्वाची आणि २४.५३ टक्के व्यक्तींमध्ये बी ९ जीवनसत्त्वाची कमतरता आहे. पश्चिम विभागातील ८२.०६ टक्के पुरुषांमध्ये तर ७८.५४ टक्के महिलांमध्ये ड जीवनसत्त्वाची कमतरता आहे. तर २३.८९ टक्के पुरुषांमध्ये आणि १५.४३ टक्के महिलांमध्ये बी १२ जीवनसत्त्वाची कमतरता आहे आणि बी ९ जीवनसत्त्वाच्या कमतरतेचे प्रमाण पुरुषांमध्ये १७.५१ टक्के तर महिलांमध्ये ९.२५ टक्के इतके आहे. (प्रतिनिधी)ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेची लक्षणेसांधेदुखी, स्नायू कमकुवत होणे, अशक्तपणा, हाडांमध्ये वेदना, थकवा, निरुत्साही वाटणे, वजन कमी होणे ड जीवनसत्त्वाचे प्रमुख स्रोत ड जीवनसत्त्व हे प्रामुख्याने सूर्यप्रकाशातून मिळते. अथवा औषधांमधून ड जीवनसत्त्व मिळू शकते. बी १२ जीवनसत्त्वाच्या कमतरतेची लक्षणेअशक्तपणा, उदासीनता, विस्मरण, अॅसिडीटी, वजन कमी होणे, मळमळ, उलट्यांचा त्रास, रक्तक्षय, आभासीपणा,श्वसनाचा त्रासप्रमुख स्रोत : मांस, मासे, चिकन, अंडी, दुग्धजन्य पदार्थ फॉलिक अॅसिड आवश्यकबी ९ जीवनसत्त्व हे सामान्यत: फॉलिक अॅसिड या नावाने ओळखले जाते. हे पाण्यात विरघळणारे असून ते बी जीवनसत्त्वाच्या गटातील आहे. फॉलिक अॅसिड हे शरीराच्या प्रमुख अवयवांच्या कार्यासाठी उपयोगी असते. उदा - डीएनए, आरएनए, पेशींची जलद विभागणी करणे, पेशींचा विकास करणे, निरोगी रक्तपेशींची निर्मिती करणे. गर्भवती महिलांसाठी बाळाचा मेंदू किंवा पाठीचा कणा (मज्जातंतूमधील दोष, पाठीच्या कण्यातील दोष) यातील जन्मजात दोष टाळण्यासाठी पुरेसे फॉलिक अॅसिड घेणे आवश्यक आहे.२० ते ४० वयोगटातील व्यक्तींमध्ये सर्वच जीवनसत्त्वांची कमतरता असल्याचे प्रमाण अधिक आहे.
भारतीयांमध्ये जीवनसत्त्व कमी
By admin | Published: October 25, 2015 3:34 AM