पंढरपूर : पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची अस्थायी समिती गुरुवारी बरखास्त करण्यात आली असून, मंदिराच्या कारभाराची सूत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहेत. विधी व न्याय मंत्रालयाने याबाबतचा निर्णय घेतला आहे़ सध्याची अस्थायी समिती बरखास्त करून नवीन १२ सदस्यांची स्थायी समिती स्थापन करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारला दिले होते. मात्र, शासनाकडून स्थायी समिती नेमण्यात आली नव्हती. दरम्यान, समितीचे अध्यक्ष आण्णा डांगे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर समिती बरखास्त करण्याच्या हालचालींना वेग आला. समितीने ५० कोटी रुपयांच्या भक्तनिवासाचे बांधकाम सुरू केल्यानंतर त्याची तक्रार पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. समितीचे सदस्य वसंत पाटील यांनीही आण्णा डांगे यांच्या कारभारावर टीका करत समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर २९ मे रोजी मंदिर समितीचे अध्यक्ष आण्णा डांगे यांनीच १५ जूनपर्यंत नवीन समिती न नेमल्यास राजीनामा देण्याची घोषणा केली होती. त्याची दखल घेत विधी व न्याय मंत्रालयाने ही अस्थायी समिती बरखास्त केली असून, मंदिराचा कारभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला आहे. (प्रतिनिधी)
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त
By admin | Published: June 12, 2015 3:51 AM