पंढरपूर (जि. सोलापूर) : वसंतपंचमीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात उपस्थित वऱ्हाडींनी अक्षता टाकून देवाचे लग्न लावले.
प्रारंभी विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीवर गुलाल उधळण्यात आला. यानंतर हाच गुलाल रुक्मिणीमातेवरही उधळण्यात आला. विठ्ठल-रखुमाईची उत्सवमूर्ती सजवून आणण्यात आली. कपाळी मुंडावळ्या बांधल्या. मधोमध आंतरपाट धरण्यात आला अन् उपस्थित भक्तांनी अक्षतांचा वर्षाव केला. यानिमित्त मंदिर आकर्षक फुलांनी लग्नमंडपाप्रमाणे सजविण्यात आले होते.
वसंतपंचमीपासून ते रंगपंचमीपर्यंत श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेस एक महिनाभर पांढऱ्या रंगाची वस्त्रे परिधान केली जातात. तसेच देवावर रोज केशरपाणी व गुलाल उधळला जातो. वसंतपंचमीपासून थंडी कमी होऊन रंगपंचमीपासून उन्हाळा सुरू होतो. ऋतुमानातील बदलाप्रमाणे देवाचे उपचार बदलतात. त्याचाच एक भाग म्हणून पांढरे वस्त्र व रंग उधळण्याची परंपरा आहे.