सुनील चाैरे -
हदगाव (नांदेड) : नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील अत्यंत दुर्लक्षित असलेले कयाधू नदीकाठावरील हस्तरा हे गाव दोन दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. या गावातील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या विवेक चौधरी यांची वायुसेना प्रमुखपदी नियुक्ती झाल्याची बातमी कळताच हस्तरा येथील ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनासा झाला. विवेक चाैधरी हे देशाचे वायुसेना प्रमुख म्हणून १ ऑक्टाेबरपासून सूत्रे स्वीकारणार आहेत. हस्तरा गावच्या सुपुत्राने घेतलेल्या या गगनभरारीने सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून आला. गावकऱ्यांनी ‘लाेकमत’ला सांगितले की, विवेक चौधरी यांचे वडील रामभाऊ गणपत चौधरी हे व्यवसायाने अभियंता होते. त्यांनी हैदराबाद येथे एक कंपनी सुरू केली होती, तर आई मुख्याध्यापिका होत्या. विवेक यांचे प्राथमिक शिक्षण हैदराबाद येथे झाले. हस्तरा येेथे त्यांची शेती व घर आहे. त्यांच्या शेतामध्ये ३०० वर्षांपूर्वी रेणुकादेवीचे मंदिर बांधलेले आहे. आजही त्यांची शेती अवधूत शिंदे हे वाहत आहेत. २०१३-१४ मध्ये विवेक चौधरी हे शेती विक्री करण्यासाठी गावात आले होते, अशी आठवण शिंदे यांनी सांगितली. निजामकाळात हस्तरा एक प्रसिद्ध बाजारपेठ होती. उमरखेड, कळमनुरी, बाळापूर येथील व्यवहार हे हस्तरा गावावरच अवलंबून होते. विवेक यांचे काका काशीनाथ हे हार्डवेअरचे मोठे व्यापारी होते.
विवेक चौधरी यांच्या शेती खरेदी-विक्रीच्या वेळेस मी साक्षीदार होतो. आम्हा गावकऱ्यांना या निवडीचा खूप आनंद झाला आहे. गावात त्यांच्या सत्काराचे नियोजन केले जात आहे. - संजय चौधरी, चुलत भाऊ, हस्तराअभिमानास्पद गगनभरारीनांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील हस्तरा गावचे भूमिपुत्र विवेक चाैधरी यांनी घेतलेली गगनभरारी अभिमानास्पद आहे. देशाच्या वायुसेना दल प्रमुखपदी त्यांची झालेली नियुक्ती ही गाैरवाची बाब आहे. त्यांनी नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा राेवला आहे. -अशाेक चव्हाण, पालकमंत्री, नांदेड