मुंबई : राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट संकलक व्ही.एन.मयेकर यांना आणि व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री अलका कुबल यांना घोषित करण्यात आला आहे.सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी येथे या पुरस्काराची घोषणा केली. मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आयुष्य व्यतीत केले आहे. तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव आणि चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जीवनगौरव पुरस्कार पाच लाख रुपयांचा तर विशेष योगदान पुरस्कार तीन लाख रुपयांचा आहे. तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मयेकर आणि कुबल यांची निवड केली. श्रावणी देवधर, भरत जाधव, शाम भुतकर, गजेंद्र अहिरे या समितीच्या सदस्यांनी या पुरस्कारांसाठी व्ही.एन.मयेकर व श्रीमती अलका कुबल यांची शिफारस केली होती. (प्रतिनिधी)घायल, घातक, दामिनी, वास्तव, अस्तित्व, मी तुझीच रे या त्यांच्या चित्रपटांच्या उत्कृष्ट संकलनाबद्दलची पारितोषिके व्ही.एन.मयेकर यांना मिळाली आहेत. ‘पसंत आहे मुलगी’, ‘जन्मदाता’, ‘मी तुझी तुझीच रे’ या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.‘चक्र’ या चित्रपटाद्वारे अलका कुबल यांचे रुपेरी पडद्यावर पर्दापण झाले. त्यापाठोपाठ त्यांनी ‘तुझ्यावाचून करमेना‘, ‘दुर्गा आली घरा’, ‘माहेरचा आहेर’, ‘देवकी’,‘नवसाचं पोर’, ‘स्त्रीधन’ असे कौटुंबिक चित्रपट केले.
व्ही.एन.मयेकर यांना जीवनगौरव पुरस्कार
By admin | Published: April 01, 2016 1:55 AM