मुंबई : वाहनातून होणाऱ्या कार्बन व नायट्रोजन आॅक्साईड अशा घातक वायूंच्या उत्सर्जनाची खरी माहिती दडवून सॉफ्टवेअरच्या आधारे ती बनावट पद्धतीने सादर करणाऱ्या फोक्सवॅगन कंपनीचे पितळ उघडे पडले असून, कंपनीच्या या पर्यावरण घोटाळ्याचा फटका सुमारे १ कोटी १० लाख वाहनमालकांना बसला आहे. जगभरातील वाहनमालकांची फसवणूक एवढीच या घोटाळ्याची व्याप्ती नव्हे, तर या बेजबाबदार वर्तनामुळे प्रदूषणाच्या मात्रेत तब्बल ४० पट वाढ झाल्याने लोकांच्या जिवाशीही कंपनीने खेळ केल्याचे दिसून आले आहे. अमेरिकी सरकारच्या पर्यावरण विषयक एजन्सीने कंपनीवर नुकताच प्रदूषण घोटाळ्याचा ठपका ठेवला होता व याच अनुषंगाने फौजदारी गुन्हा दाखल करत त्याची चौकशी सुरू केली होती. या चौकशीदरम्यान कंपनीने या गैरप्रकाराची कबुली दिली होती. त्यानंतर, सोमवारी अमेरिकेतील पाच लाख वाहने माघारी बोलवण्याची घोषणा कंपनीने केली. ज्या वाहनांमध्ये हा गैरप्रकार केला आहे, ते इंजिन ह्यईए-१८९ह्ण या बनावटीचे असून, केवळ अमेरिकाच नव्हेतर अनेक देशांतून या इंजिनचा समावेश असलेल्या कंपनीच्या गाड्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार कंपनीच्या अशा वाहनांची संख्या ही १ कोटी १० लाख इतकी आहे. या सर्व गाड्या डिझेल इंजिनच्या आहेत. (पान ४ वर) ४० पट प्रदूषण वाढविले गाड्यांचा परफॉर्मन्स वाढविण्यास कंपनीने सुधारित इंजिन विकसित केले. परंतु, या इंजिनमुळे प्रदूषणाच्या मात्रेत तब्बल ४० पट वाढ झाली. या इंजिनमधून नायट्रोजन आॅक्साईडसारख्या घातक वायूचा मोठा फैलाव झाला. हा वायू हवेत मिसळल्यास दमा, ब्रोन्कायटीससारखे दुर्धर आजार होण्याची शक्यता असते. सीईओ विन्टरकोर्न यांची गच्छंती घोटाळ्यानंतर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन विन्टरकोर्न यांची गच्छंती झाली. त्यांच्या जागी पोर्श कंपनीचे मथायस मुल्लर यांची नियुक्ती करण्याची घोषणा कंपनीने केल्याची माहिती जर्मनीतील अग्रगण्य माध्यमांनी दिली आहे. कंपनीने गैरप्रकार केलेले ह्यईए-१८९ह्ण हे इंजिन प्रामुख्याने फोक्सवॅगन गोल्फ, फोक्सवॅगन पसाट, फोक्सवॅगन जेट्टा, फोक्सवॅगन बीटल या चार मॉडेल्समध्ये आहेत. २००९ ते २०१५ अशा कालावधीत यांची निर्मिती झाली आहे. ही सर्व मॉडेल्स भारतामध्येदेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील ग्राहकांची फसवणूक करतानाच प्रदूषणाची मात्रा वाढविण्यात कंपनीचा हातभार लागल्याचा कयास आहे. ‘द अमेरिकन एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी’ने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार कंपनीने केलेल्या प्रदूषण घोटाळ््यासाठी कंपनीला १८ अब्ज अमेरिकी डॉलर इतका घसघशीत दंड होऊ शकतो. कंपनीचे अस्तित्व धोक्यात कंपनीवर १८ अब्ज अमेरिकी डॉलर इतक्या दंडाची शक्यता आहे. तसेच या घोटाळ््यातून बाहेर पडण्यासाठी, गाड्यांच्या दुरुस्तीसाठी, गरज भासल्यास त्या बदलून देण्यासाठी कंपनीला प्राथमिक अंदाजनुसार किमान सात अब्ज ३० कोटी अमेरिकी डॉलरची गरज भासणार आहे. त्यातच कंपनीच्या बाजारमूल्यातही घसणर झाल्याने कंपनीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. कंपनीचे शेअर्स कोसळले कंपनीने स्वत:च्या गैरप्रकाराची कबुली दिल्यानंतर आणि पाच लाख वाहने माघारी बोलावल्याचे वृत्त आल्यानंतर कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत १९.३ टक्क्यांनी घसरण होत कंपनीच्या बाजारमूल्यात १६ अब्ज ९० कोटी अमेरिकी डॉलरची घसरण नोंदली गेली आहे. जर्मनीतील अग्रगण्य कंपनी असलेल्या फोक्सवॅगनची नोंदणी जर्मनीसह, अमेरिका आणि युरोपातील काही प्रमुख शेअर बाजारांत आहे. (प्रतिनिधी)
सामान्यांच्या जिवाशी फोक्सवॅगनचा खेळ
By admin | Published: September 23, 2015 2:09 AM