ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 29 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नव्या गणवेशाबाबत संघ स्वयंसेवकांची प्रतिक्षा संपली आहे. मागील आठवड्यात संघ मुख्यालयात गणवेश दाखल झाल्यानंतर त्यांची प्रत्यक्ष विक्री सुरू झालेली आहे. ‘हाफपॅन्ट’ची जागा ‘फुलपॅन्ट’मध्ये घेतल्यामुळे अनेक स्वयंसेवकांमध्ये उत्साह असून यात तरुणांचे प्रमाण जास्त आहे. गणवेशांचे वाटप जरी सुरू झाले असले तरी स्वयंसेवक विजयादशमी उत्सवातच नव्या अवतारात दिसून येणार आहेत, असे संघ पदाधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.
बदलत्या काळाप्रमाणे संघाच्या गणवेशातदेखील बदल झाले पाहिजे, असा संघवर्तुळात मतप्रवाह होता. संघाने बºयाच विचाराअंती गणवेशामध्ये बदल केला. या वर्षीच मार्च महिन्यात राजस्थान येथील नागौर येथे झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेदरम्यान संघातर्फे याची घोषणा करण्यात आली होती. गणवेशातील खाकी ‘हाफपॅन्ट’च्या ऐवजी तपकिरी रंगाच्या ‘फुलपॅन्ट’चा समावेश करण्यात आला. नवा गणवेश सुरुवातीला संघाकडून तयार करण्यात येईल व केंद्रीभूत पद्धतीने त्याचे वाटप करण्यात येईल, असे ठरले होते. त्यानुसार राजस्थानमधील भिलवाडा येथे ‘टेलर्स’ची ‘टीम’च कामाला लागली होती. नवे गणवेश संघ मुख्यालयात कधी दाखल होती याबाबत स्वयंसेवकांकडून पदाधिका-यांना याची सातत्याने विचारणादेखील होत होती. काही दिवसांअगोदर संघ मुख्यालयात नवी दिल्लीहून नवा गणवेश दाखल झाला.
या विक्रीप्रक्रियेचे उद्घाटन संघाचे ज्येष्ठ प्रचारक राम बोंडाळे यांच्या हस्ते करण्यात आले. संघ मुख्यालयासोबतच रेशीमबाग स्मृति मंदिरातील साहित्य प्रचार केंद्रातदेखील गणवेश विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अनेक स्वयंसेवक स्वत: येऊन गणवेश घेऊन जाणार आहेत. तर काही स्वयंसेवकांनी शाखानिहाय खरेदीसाठी आगावू सूचना देऊन ठेवली आहे. संघाच्या शाखांमध्ये शारीरिक कसरती आणि खेळ होतात. ‘हाफपॅन्ट’ असल्याने यात अडचण जात नव्हती. परंतु ‘फुलपॅन्ट’मुळे यावर मर्यादा येऊ शकतात अशी शंका होती. या सर्व बाबींसोबतच संघाने विविध वयोगटातील स्वयंसेवकांचा विचार करुन गणवेश तयार केले आहेत. यात लहान मुलांपासून ते दणकट शरीरयष्टीच्या स्वयंसेवकांचा विचार करण्यात आला आहे. एरवी बाजारात साध्या ‘फुलपॅन्ट’ची किंमत तुलनेने महाग असते. संघातर्फे ‘फुलपॅन्ट’ स्वस्त दरात देण्यात येत आहेत.