डोंबिवली : विदर्भ-मराठवाड्यातील मतदार कल्याण-डोंबिवलीत त्यांचे एक मत शिवसेनेला देतात नंतर पुन्हा गावी जाऊन भाजपाला मतदान करतात. भाजपाचा कार्यकर्ता पुन्हा मतदानासाठी त्यांना गावी घेऊन जातो, असे खळबळजनक वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे केले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या मतदानाची शाई पुसण्याच्या धक्कादायक वक्तव्यानंतर दानवे यांचे हे वक्तव्य नवी राजकीय चर्चा घडविणारे आहे. डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिरात विदर्भ-मराठवाडा सेवा संस्थेच्या वतीने जिजाऊ जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी दानवे यांनी हे वक्तव्य केले. व्यासपीठावर उपस्थित असलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपाला साध दिली आहे. शिवसेनेच्या साथीमुळे भाजपा सत्तेत आहे, असे सांगतानाच एकच व्यक्ती दोन वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करून सत्ता कशी मिळवली जाते, याची माहिती त्यांनी दिली. या वेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी, खासदार कपिल पाटील, भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण, नरेंद्र पवार, गणपत गायकवाड, शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर, सेवा संस्थेचे दत्ता माळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष आल्यावर यावेच लागतेएखाद्या कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आले, की आम्हाला कुठल्याही कार्यक्रमाला यावेच लागते, असे वक्तव्य भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी या वेळी केले; याचबरोबर त्यांनी काही आक्षेपार्ह विधानेही केली. त्यांच्या या वक्तव्यांनंतर भाषणासाठी उभे राहिलेले प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी खासदार पाटील यांना खडेबोल सुनावले. पाटील हे धनदांडगे आहेत. पण, मराठवाडा-विदर्भ सेवा संस्थेतील लोक कष्टकरी आहेत. त्यांच्या जिवावर आपण निवडून येतो. नशीब माना की यांच्यापैकी कोणी खासदार-आमदार झाले नाहीत. ते झाले असते, तर काय झाले असते याचा विचार करा, असा गर्भीत इशाराच दानवे यांनी त्यांना दिला.
डोंबिवलीत सेनेला अन गावी भाजपाला मत : दानवे
By admin | Published: January 13, 2016 1:29 AM