'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 09:31 PM2024-10-28T21:31:55+5:302024-10-28T21:32:55+5:30
'मुख्यमंत्री बनने माझे प्राधान्य नाही. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार यावे, हे आमचे प्राधान्य आहे.'
Devendra Fadnavis: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे, हे माझ्ये प्राधान्य नाही, तर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणे प्राधान्य आहे, अशी स्पष्टोक्ती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासोबतच त्यांनी महाविकास आघाडीला आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याचे आव्हानदेखील केले. तसेच, भाजपच्या लोकसभेतील खराब कामगिरीचे कारणही सांगितले.
व्होट जिहादमुळे लोकसभेला आमचे नुकसान
टीव्ही9 च्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकसभेवेळी एक फेक नरेटिव्ह चालला गेला. लोकसभेत महाविकास आघाडीला 43.9 टक्के मते मिळाली, तर महायुतीला 43.6 टक्के मते मिळाली. पॉइंट तीन टक्क्यांनी ते आमच्या पुढे होते. पण जागांमध्ये मोठी उलटफेर झाली. त्यात दोन कारणे आहेत. संविधान बदलले जाईल, आरक्षण जाईल असे सांगितले जात होते. आम्ही ते काऊंटर करण्यात कमी पडलो. तसेच, महाराष्ट्रात आम्हाला आमचा अतिआत्मविश्वास नडला. महाराष्ट्रात व्होट जिहादमुळे आमचे नुकसान झाले. धार्मिक स्थळांना आमच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला.
फडणवीस पुढे म्हणाले, पण व्होट जिहादच्या माध्यमातून जे काही झाले, ते आता विधानसभा निवडणुकीत चालणार नाही. आता महाराष्ट्रात युतीचे सरकार स्थापन होईल. आता परिस्थिती बदलली आहे. संविधान बदलणार नाही, आरक्षणाला धोका नाही हे लोकांना माहीत आहे. आपल्या हातात संविधान घेऊन जाणारे राहुल गांधी आरक्षण संपवले पाहिजे, असे परदेशात जाऊन सांगतात. आरक्षण संपवण्याचा फॉर्म्युला सांगतात आणि नाना पटोले त्यांचे समर्थन करतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार?
यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाबाबत महत्वाचे भाष्य केले. मुख्यमंत्री बनने माझे प्राधान्य नाही. पाच वर्षे मी मुख्यमंत्री राहिलो आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार यावे, हे आमचे प्राधान्य आहे. महाविकास आघाडी जेव्हा त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करेल, त्याच्या 15 मिनिटांत आम्ही आमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करू. आमचे प्रमुख एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमच्याकडे चेहरा आहे, पण विरोधकांकडे कोणता चेहरा आहे, हे त्यांना विचारा. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आमचे पक्षश्रेष्ठी बसून घेतीत. जो निर्णय घेतील, त्यांच्यासोबत आम्ही राहू, असे फडणवीस यांनी सांगितले.