महाराष्ट्र ज्यांच्या मनात आहे आणि महाराष्ट्राचा झेंडा जे जगात फडकवताहेत, अशा दिग्गजांचा लोकमत वृत्तसमूह दरवर्षी सन्मान करतो. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराच्या माध्यमातून या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार सोहळा येत्या २० फेब्रुवारीला मुंबईत रंगणार आहे. लोकसेवा, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना यावेळी गौरवण्यात येणार आहे. त्यातील उत्कृष्ट पुरुष अभिनेता या विभागात पाच अभिनेत्यांना नामांकन मिळालं आहे. त्यांच्यापैकी, तुम्हाला जो अभिनेता पुरस्कारासाठी योग्य वाटतो, त्याला तुम्ही याच मजकुराच्या खालील बॉक्समध्ये मत देऊ शकता. सुरुवातीला या विभागात नामांकन मिळवलेल्या पाच अभिनेत्यांची थोडक्यात माहिती....
अशोक सराफ - मी शिवाजी पार्क ‘‘न्यायदेवता आंधळी असते आम्ही डोळस होतो’’ ही टॅगलाईन असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटात व्यवस्थेने गांजल्यामुळे रिअॅक्ट झालेल्या पाच ज्येष्ठ नागरिकांची गोष्ट मांडली आहे. एका घडलेल्या घटनेबाबत न्याय मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे पाच ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन आपापल्या पातळीवर कसा लढा लढतात याची कथा या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. यात अशोक सराफ यांनी दिगंबर सावंत या कॉन्स्टेबलची भूमिका साकारली आहे. आपले आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे जगणारा, आपले दु:ख कोणालाही न दाखवून देणारा दिगंबर त्यांनी खूपच चांगल्याप्रकारे सादर केला आहे. त्यांनी या भूमिकेतून पुन्हा एकदा रसिकांना भुरळ पाडली आहे.
नागराज मंजुळे - नाळसिनेमाचं झिंगाट यश अनुभवलेल्या तसेच आपल्या लेखणी आणि दिग्दर्शनाच्या जोरावर स्वत:चे वेगळेपण सिद्ध करणारा दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणजे नागराज मंजुळे. मराठी सिनेमाने आजपर्यंत कधीही न अनुभवलेली बॉक्स ऑफिसवरची १०० कोटींची कमाई नागराजने अगदी सैराटपणे करून दिली. चित्रपटरसिकांच्या मनाचा ठाव घेणारा फिल्ममेकर अशी नागराजची ओळख आहे. नाळ या चित्रपटाच्या निमित्ताने नागराजने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. सुधाकर रेड्डी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले. नाळ हा चित्रपट आठ वर्षांचा मस्तीखोर मुलगा चैतन्यवर आधारित आहेत.
स्वप्निल जोशी - मुंबई पुणे मुंबई ३२०१८ सालात मुंबई पुणे मुंबई या सिनेमाचा तिसरा भाग आला. स्वप्निलच्या गौतम या व्यक्तिरेखेने सिनेमाच्या या आधील २ भागांमधूनच रसिकांवर गारूड घातलं आहे. मुंबई पुणे मुंबई ३ मध्ये, गौतम (स्वप्नील आणि गौरी (मुक्ता बर्वे) यांचा संसार सुरू झाला आहे. ठरविलेल्या मार्गावरून आणि सारे काही आधी ठरवून त्यांचा प्रवास सुरू आहे. घर आणि कहेत. तोपर्यंत त्याच्या धडपडीला फळ मिळाले आहे आणि आता करिअरची गाडी सुसाट सुटेल, अशा वळणावर ते आहेत. याच वळणावर त्यांनी अजिबात न ठरविलेली, विचार न केलेली गोष्ट समोर येते. त्यानंतर आई-बाबांना धक्का बसतो. या घटनाक्रमातील विविध भावभावना स्वप्निलने उत्तमपणे साकारल्या आहेत.
स्वानंद किरकिरे - चुंबकएखाद्या गोष्टीपासून आपण दूर पळायला बघतो. पण ती गोष्ट काही केल्या आपला पाठलागच सोडत नाही, असे अनेकवेळा आपल्यासोबत होते. तसेच आयुष्यात अनेकवेळा आपल्याला ज्या व्यक्तींपासून पळायचे असते, तीच व्यक्ती सतत आपल्यासमोर येते. असेच काहीसे चुंबक या चित्रपटात घडते. स्वानंद किरकिरे यांनी ‘प्रसन्न’ नावाच्या व्यक्तीच्या भूमिकेसाठी जी देहबोली स्वीकारली आहे, ती एवढी प्रत्ययकारी आहे की पाहताक्षणीच त्या व्यक्तिरेखेच्या आपण प्रेमात पडतो.
सुबोध भावे - आणि डॉ. काशिनाथ घाणेकरसिनेमा, नाटक, मालिका अशा तिन्ही माध्यमात लिलया काम करून रसिकांच्या गळ्यायातील ताईत बनलेला कलाकार म्हणजे सुबोध भावे. ‘‘मला कोणतीही भूमिका द्या, मी ती माझ्या मेहनतीने आणि उत्तम अभिनयाने लोकांसमोर आणतो, उसमे क्या है...’’ यावर सुबोधची श्रध्दा. ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटात प्रेक्षकांना दिग्गज अभिनेते काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्याचा प्रवास पाहायला मिळाला. या चित्रपटात सुबोधने डॉ. घाणेकर यांची भूमिका साकारली. तो ही व्यक्तिरेखा जगला असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक समीक्षकांनी दिली आहे.