महाराष्ट्राच्या मातीतून वर आलेल्या दिग्गजांनी आपल्या कामगिरीने राज्याचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवले आहे. अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा लोकमत वृत्तसमूहातर्फे दरवर्षी सन्मान करण्यात येतो. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात येतो. येत्या 20 फेब्रुवारीला हा पुरस्कार सोहळा मुंबईत रंगणार आहे. लोकसेवा, कला, क्रीडा, वैद्यकीय, उद्योग, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात येणार आहे. यातील चित्रपट क्षेत्रातील महिला प्रवर्गासाठी आपल्या अभिनयानं सिनेरसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या पाच सुप्रसिद्ध अभिनेत्रींना नामांकन मिळाले आहे.या पाचपैकी तुमच्या पसंतीच्या अभिनेत्रीला मत देऊन 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' 2019ची मानकरी ठरवा. यासाठी मजकुराच्या खालील बॉक्समध्ये तुम्ही मत देऊ शकता. सुरुवातीला या विभागात नामांकन मिळवलेल्या पाच अभिनेत्रींची थोडक्यात माहिती....
1.देविका दफ्तरदार : सिनेमा - नाळ 'नाळ' सिनेमातील देविका दफ्तरदार यांची भूमिका वाखाण्याजोगी होती. आपल्या दत्तक मुलावर प्रचंड प्रेम करणाऱ्या आईची भूमिका त्यांनी नाळ सिनेमात साकारली आहे. दत्तक घेतलेल्या मुलाला ती स्वत: पेक्षा जास्त जपत असते. तो दत्तक आहे याची जाणीव देखील त्याला कधी करून देत नाही. पण त्याला तो दत्तक आहे हे कळल्यानंतर तो आईपासून दूर व्हायला लागतो, आपल्या खऱ्या आईला भेटण्याची त्याला ओढ लागते. या सगळ्यात त्याला अनेक वर्षे आपला मुलगा म्हणून सांभाळलेल्या आईची काय अवस्था होते हे देविकाने खूप चांगल्याप्रकारे सादर केले आहे. नाळ सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला व देविकाच्या भूमिकेचे देखील सगळीकडून खूप कौतुक झाले.
2.कल्याणी मुळ्ये : सिनेमा - न्यूड आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावं म्हणून एका कॉलेजमध्ये न्यूड मॉडेलचं काम करणा-या अभिनेत्री कल्याणी मुळ्येचं न्यूड या सिनेमामुळे देशातच नव्हे तर जगभर कौतुक झालं. पैशांची गरज असल्याने ती या व्यवसायात ओढली जाते पण याच व्यवसायावर पुढे जाऊन प्रेम करायला लागते. तिच्या आयुष्यातील विविध छटा कल्याणी मुळ्येने ‘न्यूड’ या सिनेमात मांडल्या आहेत. नाशिकमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत हिरे यांच्यासोबत नाटकांमध्ये काम सुरू असतानाच कल्याणीला एनएसडीला (राष्ट्रीय नाट्य विद्यालय) जाण्याची संधी मिळाली होती. दिल्लीला गेल्यानंतर कठोर मेहनत घेऊन कल्याणीने स्वत:ला सिद्ध केले. अनेक हिंदी मराठी नाटकातून काम, मालिका तसेच अनेक जाहिरातींमधूनही ती झळकली आहे.
3.माधुरी दीक्षित : सिनेमा - बकेट लिस्ट 'बकेट लिस्ट' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमधील धकधक गर्ल माधुरी दीक्षितने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या सिनेमात तिने मधुरा या गृहिणीची भूमिका साकारली. कुटुंबाची काळजी घेणारी, त्यांच्यातच रमणारी अशी गृहिणी आणि तिच्यावर हृदय प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया झाल्यावर आपल्याला ज्या मुलीचे हृदय मिळाले तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणारी स्त्री अशा एकाच व्यक्तिरेखेच्या दोन वेगळ्या भूमिका तिने खूप चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत. माधुरीच्या चाहत्यांसाठी बकेट लिस्ट हा चित्रपट म्हणजेच पर्वणीच होता.
4.प्रिया बापट : सिनेमा - आम्ही दोघी 'आम्ही दोघी' सिनेमात प्रिया बापटने सावी नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. सिनेमाची कथा अमला आणि सावित्री सरदेसाई (सावी) या दोन प्रमुख पात्रांभोवती फिरणारी आहे. दोघीही परस्परविरोधी स्वभावाच्या, मात्र केवळ दैवाने दोघींची गाठ पडलेली असते. फक्त या दोघींच्याच नाही तर बापलेकी, पती-पत्नी, आई- मुलगी आणि प्रेयसी-प्रियकर अशा ब-याच नातेसंबंधांवर हा सिनेमा भाष्य करतो. प्रियाने वैविध्यपूर्ण भूमिका करत स्वत:ला या सिनेमात पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
5.वैदही परशुरामी : सिनेमा - ...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर दिवंगत अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या पत्नीची, कांचन घाणेकर यांची व्यक्तिरेखा वैदेहीने '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमातून साकारली आहे. अल्लड वयातील त्यांची निरागसता, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या वेगवेगळ्या छटा वैदेही परशुरामीने सक्षमपणे रुपेरी पडद्यावर मांडल्या आहेत. वैदेही परशुरामीने 2013 साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मराठी शिवाय तिने हिंदी सिनेमातही काम केले आहे.