मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला आणि अमरावती, जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथील अनुचित घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस सतर्क झाले आहेत. मतदानासाठी लाखो पोलिसांचा फौजफाटा राज्यभर तैनात करण्यात आला आहे. मतदानाच्या दिवशी कुठेही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यादृष्टीने पोलिस सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. मतदारांनीही मतदानाचा हक्क बजावून शांततापूर्ण वातावरणात ही प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन राज्याचे पोलिस महासंचालक संजय वर्मा यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ७९,८५३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून १५३ कोटींच्या रकमेसह दारू, ड्रग्ज, मौल्यवान धातू असा ६५५.५३ कोटींचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलिस महासंचालक वर्मा म्हणाले, ज्या ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्या तेथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत, सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. सर्व मतदान केंद्रांबाहेर पोलिस तैनात आहेत. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून वेळोवेळी सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे.
७८,२६७ जणांकडे शस्त्रे
राज्यात ७८,२६७ जणांकडे परवानाधारी शस्त्रे आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यापैकी ५६,६०४ जणांची शस्त्रे जमा करण्यात आली आहेत. तर २३५ जणांची शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ६११ जणांचे परवाने रद्द करून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २,२०६ अवैध शस्त्रे जप्त करण्यात यंत्रणांना यश आले तर २० हजार ४९५ शस्त्रांना परवाना जमा करण्यापासून सूट देण्यात आली आहे.