ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 9 - वाईच्या नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे व त्यांचे पती सुधीर शिंदे यांना ठेकेदाराकडून 14 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. प्रतिभा शिंदे या भाजपच्या नगराध्यक्ष आहेत. या कारवाईमुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शौचालय बांधकामाच्या ठेकेदाराला बिल काढण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती. संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत विभागाकडे रितसर तक्रार नोंदवली. दरम्यान शुक्रवारी 11.45 वाजण्याच्या सुमारास वाई येथील पालिकेच्या आवारात सापळा रचून नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे आणि त्यांचे पती सुधीर शिंदे यांना 14 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
शिंदे या केवळ एक मताने निवडून आल्या आहेत. त्यांचे पती द्रविड हायस्कूलमध्ये पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. दोघांनाही अटक केल्यानंतर वाई पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या ठिकाणी रितसर तक्रार नोंद केल्यानंतर सातारा लाचलुचपतच्या विभागाने चौकशीसाठी त्यांना साता-याला आणले. या ठिकाणी त्यांची चौकशी सुरू होती.