लोकमत न्यूज नेटवर्कवसई : निवडणूक आयोगाने तरुण व पात्र प्रथम मतदारांची नोंदणी करण्यासाठी १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. मतदार नोंदणी कार्यालयात फॉर्म स्वीकारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पोस्टाद्वारे फॉर्म पाठवणे, आॅनलाईन नोंदणी करणे, नागरी सेवा केंद्रात नोंदणी फॉर्म भरणे आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. घरोघरी जाऊन १८ ते २१ वयोगटातील व्यक्तींकडून फॉर्म क्र. ६ भरून घेतला जाणार आहे. तसेच ८ जुलै आणि २२ जुलै या दोन दिवशी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमही राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत अधिकृत मृत्यू नोंदवहीमधील मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव यादीमधून काढण्याची कार्यवाही केली जाणार आहे. या मोहिमेत सर्व तरुण व पात्र प्रथम मतदारांनी त्यांच्या नावाची नोंद यादीमध्ये करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.दरम्यान, पालघर लोकसभा मतदारसंघात ५ जानेवारी २०१७ पर्यंत १६लाख ८४ हजार ८४३ मतदारांची नोंदणी झाली असून त्यात ८ लाख ८५ हजार ६१ पुरुष आणि ७ लाख ९९ हजार ६१७ महिला मतदारांची नोंदणी झाली आहे. विशेष म्हणजे ८५ इतर मतदारांचीही नोंदणी झालेली आहे. पालघर लोकसभा मतदार संघात विधानसभेचे डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील नालासोपारा मतदारसंघात सर्वाधिक ४ लाख १७ हजार ११८ मतदार आहेत. त्याखालोखाल वसई (२ लाख ६८ हजार ३१६), पालघर ( २ लाख ५४ हजार १९३), विक्रमगड (२ लाख ५० हजार ७७३), बोईसर (२ लाख ५० हजार ४०८) विधानसभा मतदारसंघात मतदार आहेत. डहाणूत सर्वात कमी २ लाख ४५ हजार ३४ मतदार आहेत. या मोहिमेत किती मतदार नोंदविले जातात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मतदार नोंदणी १ जुलैपासून
By admin | Published: June 05, 2017 3:09 AM