मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने १८ ते १९ वयोगटातील मतदारांच्या नोंदणीची विशेष मोहीम १७ ते २२ मार्चदरम्यान राज्यात राबविली गेली आणि त्यात १ लाख ८० हजार जणांनी नोंदणी केली. अजूनही संधी गेलेली नसून सर्वच वयोगटातील व्यक्तींना मतदानाच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी दिली.
एकाच मतदाराचे दोन ठिकाणी नाव असणे, मतदाराचा मृत्यू झाला तरी मतदार यादीत नाव असणे, असे आढळले ती नावे गाळली गेली. त्यामुळे २० लाख २१३५० नावे गाळली. ती कायम राहिली असती तर त्यांनी मतदान तर केलेच नसते शिवाय एकूण मतांची टक्केवारी कमी दिसली असती, असेही ते म्हणाले.
१,५०० मतदारांसाठी आता एक केंद्रराज्यात २०१९ मध्ये ९७ हजार ६४० मतदान केंद्रे होती. यावेळी ही संख्या ९८ हजार ११४ इतकी असेल. १५०० पेक्षा अधिक मतदार असलेल्या बहुमजली इमारती वा गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये स्वतंत्र मतदान केंद्र दिले जाईल. मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपुरात अशी १५० केंद्रे निश्चित झालेली आहेत, ही संख्या वाढविली जाईल, असे चोकलिंगम म्हणाले.
अंधांसाठी ब्रेल मतदार स्लीपराज्यातील अंध मतदारांची संख्या १ लाख १६ हजार आहे. त्यांना ब्रेल लिपीतील मतदार माहिती स्लीप दिली जाईल, तसेच मतदानाच्या ठिकाणी विशेष व्यवस्था असेल. ८५ वर्षे वयावरील मतदार आणि ४० टक्के वा त्यापेक्षा अधिकचे अपंगत्व असलेल्या दिव्यांगजनांना घरीच मतदान करता येईल.