६२ मतदार संघ : १९६२ मध्ये प्रत्येक मतदारसंघात होते लाखाच्या आत मतदार ज्ञानेश्वर मुंदे- यवतमाळ महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत मतदारांच्या संख्येत वाढ होत गेली. १९६२ च्या निवडणुकीत विदर्भातील प्रत्येक मतदारसंघात एक लाखाच्या आतच मतदार संख्या होती. मात्र आता ५२ वर्षात मतदारांच्या संख्येत चौपट वाढ झाल्याचे दिसत आहे. तसेच प्रचार तंत्रातही प्रचंड बदल झाला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर विधानसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक १९६२ साली झाली. यावेळी विदर्भात ६३ मतदार संघ होते. प्रत्येक मतदार संघातील मतदारांची आकडेवारी बघितली तर ती लाखाच्या आत होती. त्यावेळी सर्वाधिक मतदार १८७ क्रमांकाच्या नागपूर-१ मध्ये ९४ हजार ५७५ तर सर्वात कमी मतदार २०७ क्रमांकाच्या धानोरामध्ये ६० हजार ३५६ एवढे मतदार होते. यवतमाळ विधानसभा मतदारसंघातही मतदारांची संख्या ७५ हजारांच्या आसपास होती. वणी मतदारसंघामध्ये ७५ हजार २००, येळाबारा ७५ हजार ६०३, केळापूर ६४ हजार ७८३, यवतमाळ ६५ हजार २१, दारव्हा ७१ हजार ५०३, दिग्रस ७३ हजार २०१, पुसदम ७१ हजार २२५ तर उमरखेड ६१ हजार ५०२ मतदार होते. यावेळी परंपरागत मतदान पद्धतीनुसार शिक्का मारावा लागत होता. त्यावेळी अवैध मतांचीही संख्या मोठी होती. त्यामुळे निवडून येणारा उमेदवार हा ३० ते ४० हजार मते घेतली की आमदार होत होता. १९६२ च्या निवडणुकीत हिंगणघाट मतदारसंघातील विनायक माधवराव चौधरी यांनी सर्वाधिक ३७ हजार ५२३ मते मिळविली होती. त्यावेळी ६५ हजार २४० मते वैध ठरली होती. त्या खालोखाल यवतमाळ जिल्ह्यातील पुसद विधानसभा मतदारसंघात वसंतराव फुलसिंग नाईक यांनी ३६ हजार ९४६ मते घेतली होती. त्यावेळी ५९ हजार ९१७ मते वैध ठरली होती. काही उमेदवार तर वाशिम जिल्ह्यातील गोवर्धन मतदारसंघातून दहा हजार २०६ मते घेऊन रामभाऊ चिकणाजी सावदे आमदार झाले होते. मात्र ५२ वर्षात मतदार संख्येत चौपट वाढ झाल्याचे दिसत आहे. उमेदवाराला विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. साधारणत: ५० हजाराच्यावर मते घेणारा उमेदवारच विजयी होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात यंदाच्या विधानसभेत २० लाख पाच हजार ५८३ मतदार आहेत. सर्वाधिक मतदार यवतमाळ विधानसभा मतदारसंघात तीन लाख ३८ हजार ८१७ आहे. वणीत दोन लाख ६६ हजार ९७५, राळेगाव दोन लाख ६७ हजार ५३, दिग्रस दोन लाख ९२ हजार ६९३, आर्णी दोन लाख ८३ हजार ५७१, पुसद दोन लाख ७९ हजार ४९८, उमरखेड दोन लाख ७७ हजार ३६ मतदारांची संख्या आहे. अशीच संख्या विदर्भातील ६२ ही मतदारसंघाची आहे. काही मतदारसंघ तर तीन लाखांच्यावर मतदार संख्येचे आहे. मतदारांच्या संख्येत झालेल्या चौपट वाढीने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे दिव्य सर्वच उमेदवारांना करावे लागत आहे. तसेच प्रचारातही आमुलाग्र बदल झाले आहे. वाहनांची उपलब्धता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. एकंदरित वाढती मतदारसंख्या उमेदवारासाठी मात्र डोकेदुखी ठरण्याचीच अधिक शक्यता असते.
विदर्भात ५२ वर्षांत मतदारांत चौपट वाढ
By admin | Published: October 01, 2014 12:52 AM