पिंपरी : मतदानाचा हक्क अधिकाधिक लोकांनी बजावावा, मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार नोंदणीवर भर दिला आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही मतदार नोंदणीसाठी मदत करता येणार आहे, असे निवडणूक विभागाच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे प्रभाग रचना आणि आरक्षणांबद्दल कमालीची उत्सुकता आहे. निवडणूक आयोगाने पुढील सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात मतदार नोंदणी अभियानावर भर दिला आहे. महाविद्यालये, प्रभाग स्तरावरही मतदार नोंदणीचे काम सुरू आहे. मतदार अधिक प्रमाणात नोंदले जावेत आणि मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची मदत घेण्याचे ठरविले आहे. पिंपरी-चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघातील बुथनिहाय बीएलओसारखे प्रतिनिधी नियुक्त केले जाणार आहेत. त्यात सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सहभागी होता येणार आहे. बुथनिहाय एका प्रतिनिधीस ओळखपत्र दिले जाणार आहे. या व्यक्तीने मतदारांकडून अर्ज भरून घेऊन तो अर्ज मतदार नोंदणी कक्षात द्यावयाचा आहे. दिवसाला दहा अर्ज मतदार नोंदणी कक्षावर देता येणार आहे. या अर्जातील कागदपत्रांची तपासणी करून हे अर्ज मतदार नोंदणी कक्षात स्वीकारले जातील. त्यानंतर वैधता झाल्यानंतर हे मतदार नोंदणी करण्यात येणार आहे, असे निवडणूक विभागातील सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मतदार नोंदणीत कार्यकर्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2016 1:28 AM