पुणे : मतमोजणीच्या वेळी अनेकदा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आता नव्या मतदान यंत्रामध्ये दिलेले मत कागदावर देखील नोंदले जाणार आहे. त्यामुळे मोजणीच्या वेळी प्रत्येक विधानसभानिहाय एका मतदान केंद्रातील दिलेल्या मतांची आणि स्लीपवरील नोंदल्या गेलेल्या मतांची पडताळणी केली जाणार आहे. उमेदवारांच्या म्हणण्यानुसार सरसकट मतदानयंत्र आणि स्लीपवरील मतांची पडताळणी केली जाणार नसल्याची माहिती निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी लोकमत ला दिली. मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटर मशिन (ईव्हीएम) आणि व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडीट ट्रोल (व्हीव्हीपॅट) या यंत्राची जोडगळी वापरली जात आहे. अगामी लोकसभा निवडणुकीत मतदान यंत्राद्वारे दिलेले मत योग्य व्यक्तीला दिले की नाही हे समजण्यासाठी मतदानानंतर सात सेकंद संबंधित उमेदवाराचे नाव, अनुक्रमांक आणि चिन्ह व्हीव्हीपॅट यंत्रावरील स्लिपवर दिसणार आहे. संबंधित स्लिप व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये बंद राहणार आहे. निवडणुकीसाठी मतदान यंत्राचा वापर सुरु झाल्यानंतरच पराभूत पक्ष अथवा उमेदवारांकडून यंत्राच्या विश्वासार्हतेबाबत अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मतदान यंत्र हॅक केले जाऊ शकते, विशिष्ट पक्षाच्या उमेदवारालाच मत जाईल, अशी देखील सोय मतदान यंत्रात केली जाते, असे आरोप झाले आहेत. त्यामुळे पूर्वी प्रमाणे कागदी मतपत्रिकेवर मतदानास सुरुवात करावी, अशीही मागणी करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने मतदान यंत्रात सुधारणा करीत मतदाराला मतदानानंतर मत दिसण्याची सोय केली. इतकी खबरदारी घेऊनही काही व्यक्ती प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकतात. पराभूत उमेदवारांकडून फेर मोजणीची मागणी देखील केली जाऊ शकते. त्यावर आयोगाने विधानसभा मतदार संघानिहाय एका मतदान यंत्रातील दिलेली मते आणि व्हीव्हीपॅटमधील स्लीपवर नोंदली गेलेली मते यांची पडताळणी घेण्यात येणार आहे. निवडणूक कामकाजाची माहिती देताना उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह म्हणाल्या, उमेदवार म्हणतोय म्हणून सरसकट फेरमतमोजणी केली जाणार नाही. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार केंद्र चिठ्ठी टाकून निवडली जातील. त्या मतदान केंद्रात पडलेली मते आणि व्हीव्हीपॅट यंत्रातील स्लिपवर नोंदली गेलेली मते यांची पडताळणी केली जाईल. त्यामुळे सरसकट फेर मतमोजणीचा प्रश्नच येणार नाही. .
मतदान केंद्रातील यंत्रांची होणार ‘मत’ पडताळणी..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 4:25 PM
मतमोजणीच्या वेळी अनेकदा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ठळक मुद्देमतदान यंत्रातील दिलेली मते आणि व्हीव्हीपॅटमधील स्लीपवर नोंदली गेलेली मते यांची पडताळणी