नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी रविवारी (दि. १९) प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. येत्या मंगळवारी (दि. २१) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे. गुरुवारी (दि. २३) लगोलग प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.जिल्ह्यात एकूण २६५३ मतदान केंद्रांवर मंगळवारी मतदान होणार आहे. या २६५३ पैकी जिल्ह्यात जवळपास २५३ मतदान केंद्रे संवेदनशील असून, त्यातील १५ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील ठरविण्यात आली आहेत. या २५३ संवेदनशील केंद्रांवर व १५ अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने एकत्र तपासणी करीत संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्रांची निवड केली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी १ ते ६ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यानंतर १३ फेब्रुवारीला उमेदवारी अर्जांची माघार व १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात प्रचार करण्याची मुदत आहे. रविवारी (दि. १९) सायंकाळी पाच वाजता प्रचार तोफा थंडावणार असून, त्यानंतर दोन दिवस वैयक्तिक प्रचार व गुप्त भेटीगाठी सुरू होतील. मतदान केंद्रांवर कामकाज करण्यासाठी जवळपास १७ हजार २०० अधिकारी व कर्मचारी तसेच साडेआठशे वाहने अधिग्रहीत करण्यात आली आहेत. त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी २३ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल. गुरुवारी दुपारपर्यंत सर्व ७३ गट व १४६ गणांचे निकाल जाहीर होण्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे.
मंगळवारी मतदान : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
By admin | Published: February 18, 2017 9:06 PM