सचिन लुंगसे / मुंबईनिवडणुकांच्या सुट्टीचा मुहूर्त साधत अनेक जण बाहेरगावचा बेत आखतात आणि याचा विपरित परिणाम मतदानावर होतो. साहजिकच, त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होते. ही टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून योजना राबवल्या जात असल्या, तरी त्याला मिळणारा पाठिंबा कमी असतो. मात्र, या वेळी महापालिका निवडणुकीचे औचित्य साधत आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नामी शक्कल लढवत हॉटेल्स संघटनांना दिमतीला घेतले आहे. त्या नामी युक्तीनुसार, मतदान करून जो मतदार हॉटेल्समध्ये खानपानासाठी येईल, त्याला संबंधित हॉटेल्स चालकांकडून किमान ५ टक्के सवलत दिली जाणार आहे. या संकल्पनेला ‘आहार’ने ‘समथिंग एक्स्ट्रा’ असे संबोधले आहे.१० महानगरपालिकांसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, म्हणून या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या सार्वजनिक सुट्टीचा गैरवापर करत, अनेक जण आदल्या दिवशीच्या रात्री बाहेरगावी मनोरंजनासाठी शहराबाहेर पडतात. परिणामी, मतदानादिवशी कमी मतदान होते आणि मतदानाची टक्केवारी घसरते. यावर उपाय म्हणून मतदान जागृतीपासून अनेक उपाययोजना करण्यात आल्या. मात्र, त्याचा फार काही परिणाम दिसून आला नाही. परिणामी, आयोगाने आता ‘आहार’ या हॉटेल संघटनेला मदतीला घेतले आहे. ‘आहार’ संघटना मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदान करण्याचे आवाहन करत आहे. आहार संघटनेचे सचिव संतोष शेट्टी यांनी या संदर्भात ‘लोकमत’ला सांगितले की, आहार संघटनेचे सहा हजारांहून अधिक सभासद आहेत. आम्ही आमच्या सभासदांना असे आवाहन केले आहे की, मतदानादिवशी मतदान करून हॉटेल्समध्ये खानपानासाठी दाखल होणाऱ्या ग्राहकांना सूट देण्यात यावी. हे प्रमाण सध्या ५ टक्क्यांच्या आसपास आहे. या संकल्पनेला आम्ही ‘समथिंग एक्स्ट्रा’ असे म्हटले आहे. उदाहरणच घ्यायचे झाल्यास, एखादा ग्राहक एखाद्या हॉटेलमध्ये चहापानासाठी दाखल झाला, तर संबंधित ग्राहकाला चहासोबत दोन बिस्किटे ‘मोफत’ द्यायची, असे या योजनेचे स्वरूप असेल. मुळात मतदारांनी मतदान करावे, मतदानाची टक्केवारी वाढावी, हा यामागचा उद्देश आहे. सामाजिक जबाबदारीचे भान म्हणून हे काम आम्ही घेतले आहे. दरम्यान, महत्त्वाचे म्हणजे, आम्ही जरी आमच्या सभासदांना याबाबत आवाहन केले असले, तरीदेखील याबाबतची सक्ती केलेली नाही.
‘मतदान’ करणार त्याला ‘पोटभर’ मिळणार
By admin | Published: February 13, 2017 4:06 AM