विश्र्वास पाटीलकोल्हापूर : राज्यात व देशातही निवडणूकीसाठी जेवणावळी व विविध आमिषांचा महापूर आला असताना महाराष्ट्रातील एक मतदारसंघ असा आहे की जिथे लोक उमेदवारांला वोट तरी देणारच परंतू आता नोटही देवू लागले आहेत. हा मतदारसंघ आहे हातकणंगले लोकसभा व उमेदवार आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी.
त्यांना आतापर्यंत रोख १ लाख ३६ हजार रुपयांची रोख मदत झाली असून हा मदतीचा आकडा निवडणूकीपर्यंत पाऊण कोटीपर्यंत जाईल असा अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्र्नांशी बांधीलकी व व्यक्तिगत उमेदवार म्हणून स्वच्छ चारित्र्य ही शेट्टी यांची जमेची बाजू आहे. त्याला पाठबळ म्हणून लोक त्यांना हा निधी देतात.
त्यांच्या एकूण निवडणूकीत कुठेही बडेजाव नसतो. उधळपट्टी नसते. जेवणावळी, मतदारांना प्रलोभन असले मार्ग कधीच अवंलबले जात नाहीत. मी शेतकऱ्यांच्या प्रश्रांसाठी लढतो. त्याला बळ येण्यासाठी लोक मला निवडून येतात अशी भावना खासदार शेट्टी यांची असते. त्यांच्या निवडणूकीसाठी जयसिंगपूरला झालेल्या ऊस परिषदेपासूनच निधी जमा व्हायला सुरु वात झाली आहे.
शेट्टी यांनी आतापर्यंत जिल्हा परिषद, विधानसभा व दोन लोकसभा निवडणूका लढविल्या. त्यामध्ये एक नोट..एक वोट या चळवळीचा वाटा मोठा आहे. संघटनेच्या चळवळीमुळे जे आपल्या पदरात पडले त्यातील मूठभर शेट्टी यांच्यासाठी काढून देण्याची भावना शेतकरी बाळगतो त्यामुळेच ही रक्कम जमा होते. त्यांना हा मदतनिधी देणारे अत्यंत सामान्य लोक असतात.
यंदा मदतनिधी जमा करणाऱ्यांत देवाप्पा कांबळे यांनी ११ हजार, मुळचे सातारा जिल्ह्यांतील परंतू सध्या अमेरिकेत स्थायिक असलेले सुभाष घोरपडे यांनी १५ हजार तर कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील डॉ. अविनाश कोगनोळे यांनी लाखाचा निधी दिला.
इचलकरंजी येथील शकील बागवान व वीरेंद्र मेहते यांनी प्रत्येकी ५ हजारांचा निधी दिला. हा निधी देताना कोल्हापूरपासून महाराष्ट्र आणि देशाच्या बाहेरूनही निधी जमा होतो. ही रक्कम देणाºयांत शेतकरी तरी आहेतच परंतू इतरही सुशिक्षीत वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. या निधीतून संघटनेच्या उमदेवारांचा खर्च केला जातो व उर्वरित रक्कम संघटनेच्या कामासाठी वापरली जाते.गोव्याचे नुकतेच निधन झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही शेट्टी यांच्या लोकवर्गणीतून निवडून येण्याबध्दल अप्रूप व्यक्त केले होते. माजी राष्ट्रपती अब्दूल कलाम यांनीही अशा प्रकारे लोकवर्गणीतून लोकप्रतिनिधी निवडून येतो हे लोकशाही बळकट करणारे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती.संघटनेचा निधी यासाठीच होतो खर्चलोकांच्याकडून जमा होणाऱ्या पै अन पै चा खासदार शेट्टी यांच्याकडून हिशोब ठेवला जातो. संघटनेचा निवडणूकीचा खर्च म्हणजे फक्त जाहिराती व बॅनर छपाई, टोप्या आणि लाऊड स्पीकरच्या गाड्यांना दिले जाणारे भाडे हाच आहे. संघटना कार्यकर्त्यांच्या गाड्यासाठी एक रुपयाही खर्च करत नाही.
शेट्टी किंवा संघटनेच्या अन्य उमेदवाराच्या प्रचारासाठी जे कार्यकर्ते येतात ते स्वत:ची गाडी घेवून येतात व सोबत जेवणाचा डबा घेवून. त्यामुळे संघटनेचा कार्यकर्त्यांच्या जेवणावळीकर कधीच एक रुपयांही खर्च केलेला नाही. संघटनेसाठी राबणारा हाडाचा कार्यकर्ता हीच शेट्टी व संघटनेचीही मजबूत बाजू आहे.
एक नोट..एक वोट...!हातकणंगले (जि.कोल्हापूर) लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लढाऊ नेते राजू शेट्टी यांच्या निवडणूकीसाठी आतापासूनच मदतनिधी जमा होवू लागला आहे. एक नोट..एक वोट..असे त्यांनी आवाहनच केले आहे.शेट्टी यांना यापूर्वी लोकवर्गणीतून किती मिळाली रक्कम
- २००९ : ४४ लाख रुपये जमा
- २०१४ : ६४ लाख रुपये जमा
इथे करता येवू शकतो निधी...एक वोट..एक नोट चळवळीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बॅक आॅफ इंडियाच्या जयसिंगपूर शाखेत संघटनेचे अकोटंट सुरु केले आहे. त्याचा क्रमांक ०९१९२०११०००००८९ असा आहे. या शाखेचा कोड आयएफएससी-बीके १ डी ००००९१९ असा आहे.