लोणावळा, दि. 29 - लोणावळा शहराला पाणीपुरवठा करणारे टाटा कंपनीचे वळवण धरण पूर्णतः भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याने इंद्रायणी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. टाटा कंपनीकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वळवण धरणातून लोणावळा व परिसरातील गावांना पिण्याचे पाण्यासोबत खोपोली पॉवर हाऊस येथे वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्यात येते. लोणावळा परिसरात मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वळवण धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. वळवण धरणाची क्षमता ही 72.12 एमसीएम (635.20 मीटर) असून सध्या धरणात 63.76 एमसीएम (633.79 मीटर) पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर सुरू असल्याने धरणात 634.20 मीटर पाणीसाठा झाल्यानंतर धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.
धरणातून पाणी वळवण येथून सोडल्यानंतर इंद्रायणी नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या टाटाच्या डक्टलाईने तसेच आऊटलेटमधून रायगड जिल्ह्यात पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर वाढला व आवश्यकता भासल्याने दोन गेटमधून पाणी सोडण्यात येणार असल्याचे टाटा कंपनीच्या अधिकार्यांनी सांगितले.