मुंबई : राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (नियोजन व समन्वय) व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण (५२) यांनी गुरुवारी दुपारी स्वेच्छानिवृत्तीसाठी पोलीस महासंचालकांकडे अर्ज केला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस महासंचालक सतीश माथुर हे रजेवर आहेत. ते रुजू होताच लक्ष्मीनारायण यांच्या अर्जावर निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. राजीनाम्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत रविवारपासून रजेवर जाणार असल्याचेही लक्ष्मीनारायण यांनी अर्जात नमूद केले आहे.लक्ष्मीनारायण हे वरळीत पत्नी, दोन मुलांसह राहतात. ते १९९०च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. नांदेड पोलीस अधीक्षक, एटीएसमध्ये सेवा बजावल्यानंतर त्यांची हैदराबाद येथे उपमहानिरीक्षक म्हणून बदली झाली. प्रभावी भाषणामुळे लाखो तरुणांशी ते जोडले गेले. त्यानंतर त्यांनी सीबीआयचे मुख्याधिकारी म्हणून पदभार सांभाळला. पुढे ठाणे पोलीस आयुक्तालयात सहआयुक्त म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली. विकासक सूरज परमार आत्महत्या प्रकरणात त्यांनी नगरसेवकांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर राज्य पोलीस मुख्यालयात प्रशासन विभागात नियुक्ती झाली. त्यानंतर वर्षभरापूर्वीच त्यांची बदली नियोजन व समन्वय पदावर झाली. त्यांनी आतापर्यंत अनेक मोठे घोटाळे उघडकीस आणले. त्यांचा सामाजिक कार्यातही पुढाकार असतो.गुरुवारी ते नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले. दरम्यान दुपारी १च्या सुमारास त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात दिला. लक्ष्मीनारायण यांच्याशी या प्रकरणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. गेल्या काही दिवसांपासून ते तणावात असल्याची माहिती समजते.
व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:27 AM