- रूपेश उत्तरवार यवतमाळ : मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक भागात धुवांधार पाऊस बरसत आहे. या ठिकाणच्या धरणात क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्याने धरणाचे दरवाजे उघडले आहे.तर काही प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहे. याचवेळी मध्य विदर्भ आणि मराठवाड्यात हलका पाऊस होत आहे. यामुळे या भागातील धरणे भरलेली नाही. राज्यातील ३२६७ धरणांतील या विसंगतीने शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे.सर्वाधिक वाईट स्थिती मराठवाडा आणि मध्य विदर्भातील प्रकल्पांची आहे. अमरावती विभागातील १० मोठ्या प्रकल्पांत दोन महिन्यांनंतर १२.६२ टक्केच जलसाठा झाला. औरंगाबाद विभागातील ४५ प्रकल्पांत ३.०८ टक्के पाणी आहे. नागपूर विभागातील १६ प्रकल्पांत २२ टक्के पाणी आहे. मध्यम प्रकल्पाची अवस्थाही अशीच आहे. अमरावती विभागातील २५ मध्यम प्रकल्पांत ३२ टक्के, तर औरंगाबाद विभागातील ८१ प्रकल्पांत ४.५८ टक्के पाणी संचय झाला आहे. अमरावती विभागातील ४११ लघु प्रकल्पांत ६.५२ टक्के जलसाठा आहे. औरंगाबाद विभागातील ८६८ प्रकल्पात १.६१ टक्केच पाणी आहे. जलसाठ्याच्या या स्थितीमुळे भविष्यात रबीची लागवड करता येणार किंवा नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.३० लाख हेक्टरवरील उत्पन्न घटणारपावसाच्या असमानतेने पेरणी बाकी असलेल्या ३० लाख हेक्टरवरील क्षेत्रात शेतकऱ्यांनी ऐनवेळी नियोजन बदलले आहे. अल्पावधीत हातात येणारे पीक लावायचे किंवा रबीतच लागवड करायची, याबाबत शेतकरी विचार करत आहेत. यामुळे या क्षेत्रातील उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटण्याचा धोका आहे. यात पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांना फटका बसणार आहे.मुठा नदी वाहिली दुथडीपुणे : शंभर टक्के भरलेल्या खडकवासला आणि पानशेत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्याने पानशेत धरणातून जवळपास तेरा हजार क्युसेकने खडकवासला धरणात पाणी सोडण्यात आले. परिणामी शनिवारी सकाळी अकरा वाजता खडकवासला धरणात यंदाच्या हंगामातील सर्वोच्च २७,२०३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीपात्राच्या दोनही बाजूचे रस्ते पाण्याखाली गेले होते.उजनीत १९ टीएमसी पाणीसाठाजिल्ह्यातील धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्याने उजनी धरणात शनिवारी सायंकाळी पाच पर्यंत १९.४२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला. शनिवारी सायंकाळ नंतरही विसर्ग सुरु असल्याने, रविवारी पाणीसाठ्यात मोठी वाढ होईल.
प. महाराष्ट्र ओव्हरफ्लो, विदर्भ कोरडा; मोठे प्रकल्प ३ टक्केच भरले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 1:48 AM