हिवराबाजार (जि. नागपूर) : पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पवनी (ता. रामटेक) बफर झोनमधील टुय्यापार बीटमध्ये शनिवारी सायंकाळी एका वाघिणीचा मृतदेह आढळला. श्वसनाच्या त्रासाने हा मृत्यू झाल्याचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, याच भागात २१ डिसेंबर २०१६ रोजीही वाघिणीचा मृतदेह आढळला होता.जंगलात शनिवारी फायर लायनिंगचे काम करीत असताना वन मजूरांना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मृत वाघिण आढळली. वन अधिकाऱ्यांनी लगेच घटनास्थळाला भेट देत मृतदेह ताब्यात घेतला. रविवारी मुख्यवन संरक्षक कार्यालयातील पशुधन अधिकारी डॉ. बी. एम. कडू तसेच देवलापार येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. रडके यांनी वाघिणीचे शवविच्छेदन केले. वाघिण अंदाजे सात वर्षांची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वाघिणीचे सर्व अवयव शाबूत असल्याने तिची शिकार करण्यात आलेली नाही. तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)
पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघिणीचा मृत्यू
By admin | Published: January 16, 2017 5:45 AM