प्रफुल्ल लुंगे, सेलू (वर्धा)बोर व्याघ्र प्रकल्पातील कॅटरिना नामक वाघिणीच्या आठ महिन्यांच्या चार बछड्यांपैकी दोन बछडे महिन्याभरापासून वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिसले नाहीत. पण वाघिणीसोबत तीन बछडे असून, एकच बछडा दिसत नसल्याचे व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी सांगतात.बोर अभयारण्याला यंदाच व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. अलीकडेच झालेल्या प्राणी गणनेत या ठिकाणी लहान-मोठे ९ वाघ व १२ बिबट असल्याची माहिती व्याघ्र प्रकल्पाच्याच अधिकाऱ्यांनी दिली. कॅटरिना नामक वाघिणीने एकूण चार बछड्यांना जन्म दिला. व्याघ्र प्रकल्पात लावलेल्या कॅमेऱ्यांत व अधिकाऱ्यांना वाघिणीसोबत चार बछडे दिसत होते. गत एक महिन्यापासून आठ महिने वयाच्या चार बछड्यांपैकी दोन बछडे दिसत नसल्याची चर्चा सुरू आहे. या बछड्यांची शिकार झाली की अन्य कारणाने त्यांचा मृत्यू झाला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण दोन नव्हे, तर केवळ एकच बछडा दिसत नसून ‘तो’ जंगलातच इतरत्र हरविला असावा, असा अंदाज लावून अधिकारी वेळ मारून नेत आहेत.पक्षी व प्राणी अभ्यासकांच्या मते आपल्या छोट्या बछड्यांना सोडून वाघीण राहू शकत नाही. आईपासून हे बछडेही दूर जात नाहीत. मग, नेमके या बछड्यांचे झाले तरी काय? हा संशोधनाचा विषय आहे. तेथील वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मते, ही घटना सर्व अधिकाऱ्यांना माहिती आहे. खासगीमध्ये हे अधिकारी बछड्यांचा शोध लागणे आवश्यक आहे, अन्यथा प्रकरण आपल्या अंगलट येणार, याची धास्ती बाळगून आहे; पण वरवर या प्रकरणाचे गांभीर्य इतरांपासून लपविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसते. या गंभीर प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून दखल घेणे गरजेचे झाले आहे.
वाघिणीचे दोन बछडे महिनाभरापासून बेपत्ता
By admin | Published: September 01, 2015 1:52 AM