मुंबई - राज्यातील राजकारणात विविध चर्चांना उधाण आलेले असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधान माध्यमांमध्ये चर्चेत आले आहे. १५ दिवस वाट पाहा, मग काय होते ते कळेल असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी राजकीय वर्तुळातील चर्चेवर भाष्य केले आहे. त्यामुळे नेमकं राज्यात काय घडणार? अजित पवार काय निर्णय घेणार? याबाबत विविध चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, १५ दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच मोठे राजकारण होणार आहे. त्यामुळे आपण १५ दिवस वाट पाहूया. २ ठिकाणी मोठे राजकीय बॉम्बस्फोट होणारच आहेत असं त्यांनी सांगितले. त्याचसोबत पत्रकारांनी राज्यातील सरकार कोसळणार का असं विचारले असता १५ दिवसांची वाट पाहा सर्व काही समजेल असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे १५ दिवसांनी राज्यात काय होणार असाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
अजित पवार यांच्या नावाची अफवानागपूरात एकीकडे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आहे तर दुसरीकडे भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यातच अजित पवार हे भाजपात सहभागी होऊ शकतात अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. अमित शाह यांच्यासोबत बैठक झाल्याची बातमी समोर आली परंतु अजित पवारांनी याबाबत स्पष्ट शब्दात नकार दिला. ती बातमी खोटी असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केले.
शरद पवारांनी अदानी प्रकरणात घेतलेली भूमिका, त्यानंतर अजित पवारांनी पीएम मोदी यांच्या डिग्रीवरून सुरू असलेल्या वादावर केलेले भाष्य यामुळे राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार असं म्हटलं गेले. इतकेच नाही तर EVM वरही अजित पवारांनी भरवसा दाखवला. अलीकडेच भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देशाच्या हितासाठी राष्ट्रवादीसोबत येणार असेल तर हरकत नाही. आम्ही त्यांचे स्वागत करू असं म्हटलं. राज्याच्या राजकारणात उमटणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा पडद्यामागून मोठ्या हालचाली सुरू झाल्यात का? असा प्रश्न पडतोय. त्यात प्रकाश आंबेडकरांनी १५ दिवस थांबा हे विधान करून नव्या चर्चेला उधाण आणले आहे.