लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री (जि. जालना) : दोन-तीन दिवस थांबा, मोठा पर्दाफाश होणार असल्याचा दावा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी (दि.३१) अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत केला. प्रवीण दरेकर यांनी काल रात्री मुंबईत बैठक घेतली. या बैठकांमधून मराठ्यांचे आंदोलन चिघळवण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जरांगे-पाटील म्हणाले की, माझी निष्ठा तुम्ही विकत घेऊ शकत नाही. मराठा आता कुठल्याही पक्षाला महत्त्व देत नाही, त्यांना पक्षात राहायची इच्छा राहिलेली नाही. आता लढा सामान्यांच्या हातात आहे. आता टेन्शन घेत नाही. आता लवकरच पर्दाफाश होणार आहे.
मुदतवाढ निरर्थक
विद्यार्थ्यांना एसईबीसी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस हे तिन्ही आरक्षण ठेवावे. मुलींना मोफत शिक्षण द्यायचे असेल तर अटी, शर्ती रद्द करा. सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ दिली आहे. त्याबद्दल समाजाच्या वतीने आभार मानतो. मुदतवाढ देऊन काम होत नाही, त्यांना काम करायला लावा, नुसती मुदतवाढ देण्यात काही अर्थ नाही, असेही ते म्हणाले.
गरजवंतांच्या बाजूने उभे राहावे
जरांगे-पाटील यांनी २८८ उमेदवार उभे करावेत, असे प्रकाश आंबेडकर बोलले होते. आम्ही २८८ जागा लढणारच आहोत. आंबेडकर यांचा सल्ला प्रत्येक वेळेस आम्ही मानत आलो आहे. त्यांना मराठा समाज मानतो, त्यांनी गरिबांच्या आणि गरजवंतांच्या बाजूने राहावे, एवढीच अपेक्षा आहे, असेही जरांगे-पाटील म्हणाले.