मुंबई : मी जिवंत असेपर्यंत महाराष्ट्र मोदी-शाह-अदानींचा होऊ देणार नाही. तसेच राज्यातील महायुती सरकारने शेवटच्या दिवसात जनतेच्या मुळावर येणारे जे निर्णय घेतले ते आमचे सरकार येताच रद्द केले जातील, दोन महिने थांबा कोणालाही सोडणार नाही, असा इशारा उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी शिवाजी पार्कवरील पक्षाच्या दसरा मेळाव्यात दिला.
११ दिवसात महायुती सरकारने १६०० निर्णय घेतले. त्यातील अनेक मी रद्द करणार. बिल्डरांचे, विकासकांचे खिसे भरणारे निर्णय रद्द करणार, अधिकाऱ्यांना मी सांगतो, त्यांना अन् तुम्हालाही जेलमध्ये टाकू. मुंबई महापालिकेच्या तीन लाख कोटी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. कंत्राटदारांच्या घश्यात पैसा टाकला जात आहे, त्यांची यादी घेऊन सत्ता येताच जेलमध्ये टाकू. सिमेंट रस्त्यांमध्ये खडी टाकणारे कोण याची चौकशी करणार. गावठाणांमधील अकृषक कर रद्द करण्याचा सरकारचा निर्णय शिंदेंनी मित्रांसाठी घेतला, दोन महिने थांबा, आमचे सरकार येऊ द्या, असे सगळे निर्णय रद्द करू असे ते म्हणाले.
यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे पहिल्यांदाच भाषण झाले. रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे व्यासपीठासमोर बसले होते.
शिंदेच्या एन्काऊन्टरचे समर्थनबदलापूरमधील शिंदे एन्काऊन्टरचे उद्धव ठाकरे यांनी समर्थन केले. अशा नराधामाला गोळ्या घातल्याच पाहिजे. आनंद दिघे असते तर त्यांनी तेच केले असते पण या एन्काऊन्टरच्या आड पुरावे नष्ट करून कोणाला पाठीशी घातले जात असेल तर त्याचाही उलगडा झाला पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकार येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांची मंदिरे-आपले सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरे बांधण्यात येतील असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. जे शिवरायंच्या मंदिरांना विरोध करतील त्यांना महाराष्ट्र बघून घेईल. -शिवरायांची मंदिरे बांधायची नाहीत तर मोदींची बांधायची का? जय श्रीरामपेक्षाही मोठ्याने आम्ही ‘जय शिवराय’ म्हणणार. महायुती सरकारने शिवरायांच्या पुतळ्यात पैसे खाल्ले, तरीही त्यांना शिवराय मत मिळवायचे यंत्र वाटते, अशी टीका त्यांनी केली. -आपले सरकार येताच धारावी पुनर्विकासाचे टेंडर रद्द करू असेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.