प्रफुल्ल बाणगावकर,कारंजा लाड (जि. वाशिम)- परिवर्तनाची दिंडी खांद्यांवर घेऊन राज्यातील गावागावांत फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार प्रचारण्यासाठी काम करणाऱ्या समतादूतांना चार महिन्यांपासून नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात साजरी होत आहे. या समतादूतांना ११ महिन्यांचा करार संपल्यानंतर नव्याने नियुक्तीपत्र देणे आवश्यक असते.‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’ अर्थात ‘बार्टी’च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात समतादूत प्रकल्प राबविण्यात येत आहे. जातीविरहित समता प्रस्थापित करण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समतादूत नेमण्यात आले. त्यांचे रितसर प्रशिक्षणही नाशिक येथे झाले. त्यानंतर समतादूतांना २७ जुलै २०१५ ला रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. या समतादूतांनी महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे समताविषयक विचार, शाळा, महाविद्यालये, ग्रामसभा व गाव बैठकीच्या माध्यमातून मांडले. तसेच त्यांच्याकडून अंधश्रद्धा निर्मूलन, अॅट्रॉसिटी अॅक्ट याबाबतही जनजागृती करण्यात आली. मात्र २७ जून २०१६ ला समतादूतांचा ११ महिन्यांचा करार संपला. त्यानंतर बार्टीने आढावा घेतला; परंतु अद्याप समतादूतांना नियुक्तीचे आदेश दिले नाहीत.>करार संपलेल्या पूर्वीच्याच समतादूतांना पुन्हा करारावर घेण्याचे काम सुरू आहे. येत्या दहा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही अडचणींमुळे या प्रक्रियेला उशीर होत आहे.- डॉ. वसंत रामटेके, मुख्य प्रकल्प संचालक, समतादूत, बार्टी
‘बार्टी’च्या समतादूतांना नियुक्तीपत्राची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2016 4:38 AM