मुंबई : घाटकोपर स्थानकात झालेल्या रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या मोनिका मोरेच्या कृत्रिम हातांची अखेरची पूर्वचाचणी पार पडली आहे. यानंतर जर्मनीवरुन हात येणार असून २१ मेला मोनिकावर शस्त्रक्रिया करुन कृत्रिम हात बसविण्यात येणार आहेत. या शस्त्रक्रियेनंतर मोनिकाला हालचाल करणे शक्य होणार असून त्यासाठी नव्या उत्साहाने मोनिका सरावाला लागली आहे.केईएम रुग्णालयात पार पडलेल्या पूर्वचाचणी दरम्यान मोनिकाच्या चेहर्यावर आशेची लकेर उमटली. तब्बल तीन महिने जगण्याचा आत्मविश्वासच हरपलेल्या मोनिकाच्या चेहर्यावर या चाचणीदरम्यान जणू पुनर्जन्म मिळाल्याची भावना होती. यावेळी कित्येक दिवसांनी मोनिकाच्या चेहर्यावर तिच्या कुटुंबियांनी हसू पाहिले. या चाचणीत कृत्रिम हातांच्या हालचाली, बोटांची हालचाल सामान्यपणे होण्यासाठी सराव सुरु आहे; या सरावाला ती सकारात्मक प्रतिसादही देत आहे. अंतिम शस्त्रक्रिया पार पडेपर्यंत तिचा सराव सुरु राहिल. याशिवाय, या कृत्रिम हातांचा रंगही मोनिकांच्या हातांसारखाच असेल, अशी माहिती मोनिकाचे वडील अशोक मोरे यांनी दिली.घाटकोपर स्थानकात ११ जानेवारी रोजी मोनिका मोरे हिचा फलाट आणि लोकलच्या पोकळीत अडकल्याने अपघात झाला होता. वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाला शिकणार्या मोनिकाने या अपघातात दोन्हीही हात खांद्यापासून गमावले. त्यानंतर तिला उपचारासाठी राजावडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु यंत्रणेच्या अभावामुळे केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र मोनिकाच्या जीवनाला नवसंजीवनी देणार्या कृत्रिम हातांसाठी मोरे कुटुंबियांना देश-विदेशातून मदत मिळाली. याच मदतीच्या माध्यमातून लवकरच तिची कृत्रिम हातांची शस्त्रक्रिया पार पडेल. (प्रतिनिधी)
आता प्रतिक्षा कृत्रिम हातांची...
By admin | Published: May 14, 2014 7:16 PM