पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणूक यासाठी काम करणारे शेकडो कर्मचारी आणि अधिकारी अनेक दिवसांपासून त्या त्या कामासाठी मिळणा-या भत्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. पुणे महानगरपालिकेची निवडणूक संपून २२ दिवस उलटूनही अद्याप भत्ता जमा केला गेलेला नाही. काम संपल्यानंतर त्वरीत भत्ता देण्याचे आश्वासन आणखी आठवडाभर प्रत्यक्षात येण्याची चिन्हे नाहीत.पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुमारे ३४३२ मतदान केंद्रे आणि २० हजार कर्मचा-यांनी २१ फेब्रुवारीच्या मतदानासाठी काम केले.पिंपरी चिंचवड पालिका आणि जिल्हा परिषदेच्या तसेच पुणे पालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण ६० हजार कर्मचारी नियुक्त होते. एका केंद्रामध्ये साधारणत: ६ जणांचे मनुष्यबळ नियुक्त होते. केंद्रप्रमुख, ३ मतदान अधिकारी, एक शिपाई आणि एक पोलीस कर्मचारी यांचा त्यात समावेश होता. त्यांच्या स्तराप्रमाणे भत्ता दिला जाणार आहे.कॅ शलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने या सर्व कर्मचा-यांना त्यांचा भत्ता आॅनलाईन जमा करण्याचा निर्णय घेतला होता. तो त्वरीत देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. निवडणुकीपुर्वी अनेक शिक्षकांचे ३ महिन्यांपासून वेतन झाले नव्हते. निवडणुकांमध्ये भत्त्याचे मिळणारे रोख पैसे यंदा न मिळाल्याने पैशांची चणचण निर्माण झाली. दोन दिवसांचा खर्च कसा भरुन काढायचा असा प्रश्न अनेकांना आला. लोकसेवा आयोगाच्या झालेल्या दोन परिक्षा, शिष्यवृत्ती परिक्षा यांचे मानधन कर्मचा-यांना रोख देण्यात आले. बहुसंख्य शिक्षकांनी या दोन्ही परिक्षा आणि निवडणुकांसाठी काम केले आहे. निवडणुका संपून २२ दिवस उलटूनही अद्याप मानधन मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये चर्चा सुरु आहेत.
निवडणूक कर्मचारी भत्त्याच्या प्रतिक्षेत
By admin | Published: March 15, 2017 3:39 AM