बुलढाणा: निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे पिकांची भिस्त इतर जलस्रोतांवर आहे. अशा स्थितीत पाण्यासाठी कृषिपंप हा एकमेव पर्याय असताना, राज्यभरातील २ लाख ७३ हजार कृषिपंप विद्युत जोडण्यांच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामीण भागातील शेतकर्यांची आर्थिक स्थिती उंचावण्यास शेतीच्या माध्यमातून मदत व्हावी, पिकांना पाणीपुरवठय़ासाठी पर्याय मिळावा, म्हणून शेतकर्यांसाठी कृषिपंपांच्या विविध योजना शासनाकडून राबविल्या जातात. शासनाकडून कृषिपंप मिळालेल्या लाभार्थी शेतकर्यांनी वीज जोडणीसाठी म्हणून वीज कंपनीकडे पैशाचा भरणा केला; मात्र महावितरणकडे अर्ज करूनही, अशा लाखो शेतकर्यांच्या कृषिपंपांना अद्यापही वीजपुरवठा करण्यात आलेला नाही. वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भातील शेतकर्यांचा आकडा मोठा आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या अकरा जिल्ह्यांमध्ये महावितरणकडून २0१३ साली २५ हजार ७७९ कृषिपंपांना वीज जोडणी देण्यात आली; मात्र, आवश्यक रक्कम भरूनही ५४ हजार ६४३ कृषिपंप वीज जोडणीच्या प्रतीक्षेतच आहेत. वीज वितरणचे अधीक्षक अभियंता किशोर शेगोकार यांनी सांगितले की, कृषी विभागाचा अहवाल आणि प्राप्त आदेशानुसार वीज कर्मचारी आणि स्थानिक लोकांच्या उपस्थितीत कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे; मात्र, नवीन वीज जोडणी देण्याशी याचा काहीही संबंध नाही.
दोन लाख कृषिपंपांना वीज जोडणीची प्रतीक्षा
By admin | Published: July 08, 2014 9:54 PM