काकाच्या मृत्यूची वाट पाहताय, हद्द झाली; अजित पवारांच्या 'शेवटच्या निवडणुकी'वर आव्हाडांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 04:50 PM2024-02-04T16:50:14+5:302024-02-04T16:51:02+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना शरद पवारांपासून सावध करताना ते ही शेवटची निवडणूक म्हणून भावनिक साद घालतील, कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत... असे वक्तव्य केले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना शरद पवारांपासून सावध करताना ते ही शेवटची निवडणूक म्हणून भावनिक साद घालतील, कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत... असे वक्तव्य केले होते. यावरून शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघतोय. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता. काकीचे कुंकू कधी पुसले जाईल याची तुम्ही वाट पाहताय, तुमच्यासोबत काम केल्याची आता लाज वाटतेय, अशी टीका आव्हाडांनी केली आहे.
ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीचे कुंकू कधी पुसले जाईल याची आज तुम्ही वाट बघत आहात. असले घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते. ही महाराष्ट्राची आणि बारातमीची जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेल, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.
एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणे कितपत योग्य आहे. शरद पवार अजरामर राहतील, त्यांचे योगदान अजरामर राहील. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता. अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली आहे. आधीही तुमच्यासोबत काम केल्याची लाज वाटतच होती. शरद पवार यांचे प्रत्येक निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे आहेत. तुमचा एक निर्णय दाखवा, असे आव्हान आव्हाड यांनी दिले.
अजित पवारांना कधी ओळखले नाही ही शरद पवारांची चूक झाली. शेवटच्या निवडणुकीची वेळ तुमच्यावर पण येणार आहे, असेही आव्हाड म्हणाले.