महाराष्ट्राच्या यादीची प्रतीक्षाच; युती अन् आघाडीत जागा वाटप निश्चित होत नसल्याने पेच
By यदू जोशी | Published: March 9, 2024 06:30 AM2024-03-09T06:30:19+5:302024-03-09T06:32:21+5:30
महायुतीमध्ये भाजप ३४ ते ३५ जागा लढणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार असताना त्याहीपेक्षा कमी जागा त्यांना मिळणार असल्याचे जे चित्र समोर आल्यामुळे चलबिचल आहे.
मुंबई : लोकसभेसाठी राज्यातील सत्तारूढ महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडीला अद्याप एकही उमेदवाराच्या नावाची घोषणा करता आलेली नाही. त्यासाठी आणखी किमान दोन दिवस लागतील अशी शक्यता आहे. दोघेही एकमेकांच्या नावांचा अंदाज घेत आहेत. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होत नसल्याने घोडे अडले आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांचे नेते रात्री दिल्लीत पोहोचले असून रात्री उशिरा फॉर्म्युला ठरेल व दोन दिवसांत घोषणा केली जाईल, असे म्हटले जात आहे.
महायुतीमध्ये भाजप ३४ ते ३५ जागा लढणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार असताना त्याहीपेक्षा कमी जागा त्यांना मिळणार असल्याचे जे चित्र समोर आल्यामुळे चलबिचल आहे. मविआमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला २० हून अधिक जागा मिळणार असल्याचे चित्र असताना शिंदेंच्या शिवसेनेला महायुतीत त्याहून निम्म्याही जागा मिळणार नसतील तर भाजपसोबत जाण्याचा फायदा काय, असा सवाल आता शिंदे यांचे समर्थक आमदार, खासदार करीत आहेत.
त्याचवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत मिळणार असलेल्या जागांपेक्षा दोन तरी अधिक जागा महायुतीत आपण घ्यायला हव्यात, असा दबाव राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर वाढविला आहे.
मविआचे जागा वाटपाचे घोडे वेगवेगळ्या कारणांनी अडले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी त्यांच्यासोबत जाणार की नाही हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याने नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिवच्या जागांबाबत आधी घेतलेला जागा वाटपाचा निर्णय महाविकास आघाडीला बदलावा लागत आहे.
भाजपचीही कसरत
- भाजपला स्वत:चे चार ते पाच उमेदवार ठरविताना बरीच कसरत करावी लागत आहे. पक्षात काही धक्कादायक बदल असू शकतात. महाविकास आघाडीतील एकदोन बडी नावे कमळ हातात घेऊ शकतात.
- मुंबईत तिन्ही खासदारांना संधी नाकारली जाण्याची शक्यता आहे आणि याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने आधीच दिले होते. उत्तर महाराष्ट्रातही अत्यंत महत्त्वाचे आणि अचंबित करणारे बदल घडू शकतात.