पुणे : तळगाळातील पक्षकारांनासुद्धा आपल्या संदर्भातील निकाल अधिक चांगल्या रितीने समजावा यासाठी न्यायालयाने त्यांचे निकाल मराठी द्यावे असे आदेश असूनही प्रत्यक्षात बहुतांश न्यायाधीश अजूनही इंग्रजीतच निकाल देतात असे चित्र आहे. त्यामुळे मराठी निकालासाठी अद्यापही पक्षकार प्रतिक्षेत आहेत.‘शहाण्याने न्यायालयाची पायरी चढू नये’ या उक्तीसहच सामान्य माणूस न्यायालयापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र काहीतरी प्रसंग ओढावल्याने वा घटना घडल्यानंतर सामान्यांनाही न्यायालयात जावेच लागते. त्यातच न्यायालयीन कामकाज मुळातच सर्वसामान्य व्यक्तींना कळण्यास अवघड असतात. त्यामुळे पक्षकारांना न्यायालयीन कामकाजाविषयी प्रत्येकवेळी वकिलांवर अवलंबून रहावे लागते. वकिलांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून त्यांना आपल्या खटल्याची माहिती घ्यावी लागते. ही सगळी अडचण लक्षात घेऊन, तसेच स्थानिक भाषेत निकालामुळे प्रलंबित खटल्यांचे प्रमाणही वाढेल या अपेक्षेने उच्च न्यायालय व राज्य शासनाने वेळोवेळी परिपत्रक काढून, न्यायाधीशांनी निकाल मराठीत द्यावे असे सांगण्यात आले आहे. मराठीतून निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना प्रोत्साहन भत्ता दिला जातो. मात्र अद्यापही बहुतांश न्यायाधीश हे इंग्रजीतूनच निकाल देतात. पक्षकारांना उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागता यावी यासाठी इंग्रजीतून निकाल देत असल्याची पळवाट काढली जाते. न्यायालयीन कामकजात पुरावा, जबाब, इतर कागदपत्रांपासून ते आरोपपत्रापर्यंत बहुतांश गोष्टी या मराठीतूनच घेतल्या जातात. मात्र न्यायाधीश निकाल इंग्रजीतच देतात. पक्षकारांवर याचा परिणाम होतो. हे टाळण्यासाठी न्यायाधीशांनी निकाल मराठीतून द्यावे अशी अपेक्षा पक्षकारांकडून व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)मराठीत निकाल देणाऱ्या न्यायाधीशांसाठी काही प्रमाणात प्रोत्साहन भत्ताही ठेवण्यात आला आहे. न्यायाधीशांनी ही बाब उचलून धरलेली दिसत नाही. मुळात इंग्रजी आणि मराठी असे दोनदा रेकॉर्डिंग करण्याची पद्धतच बंद करायला हवी. केवळ मराठीतूनच रेकॉर्डिंग व्हावे यामुळे त्यात गुंतलेला कर्मचारी वर्ग इतर कामाकडे वळेल. चीन, फ्रान्स, इटली अशा देशांतही त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये निकाल दिला जातो तर आपल्याकडे देण्यास काय अडचण आहे? शिवाय उच्च न्यायालयात जाण्याचे प्रमाण अगदीच थोडे आहे, त्यामुळे प्रथमवर्ग दंडाधिकारी व सत्र न्यायाधीशांनी मराठीतून निकाल देणे जास्त महत्त्वाचे आहे.- अॅड. एस.के. जैन, ज्येष्ठ विधिज्ञउच्च न्यायालय व महाराष्ट्र सरकारने न्यायाधीशांनी निकाल मराठीत द्यावे असे सांगितले आहे. मात्र, अद्यापही न्यायाधीशांची याबाबत अनास्था आहे. संगणकावर इंग्रजीच टायपींग आहे अशी सबब दिली जाते. उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी इंग्रजीतून निकाल दिला जातो असे ही कारण पुढे केले जाते मात्र प्रत्यक्षात ज्या पक्षकाराला दाद मागायची असेल तो त्याचे भाषांतर करून घेईल त्यासाठी न्यायाधीशांनी इंग्रजीत निकाल देण्याची आवश्यकता नसते. - अॅड. सुरेशचंद्र भोसले, ज्येष्ठ विधिज्ञ
मराठी निकालासाठी अद्याप प्रतीक्षाच !
By admin | Published: February 27, 2016 2:12 AM