मुंबई : तक्रारी व मदतीसाठी एसटी महामंडळाने अद्ययावत २४ तास कॉल सेंटर उभारण्याचा निर्णय घेऊन एक वर्ष उलटले तरीही नवी यंत्रणा अद्यापही उभी राहिलेली नसून अंतिम टप्प्यात असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १७ हजार गाड्या असून, वर्षाला जवळपास ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. एसटी महामंडळाने आपल्या हेल्पलाइनमध्ये बदल करून नवे कॉल सेंटर उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एसटी महामंडळाची १८00२२१२५0 ही टोल फ्री हेल्पलाइन असून, ही सेवासुद्धा २४ तास उपलब्ध आहे. यासाठी पाच ते सहा कर्मचारी काम करतात. एसटी मुख्यालयात हेल्पलाइनचा पसारा एका रूममध्ये थाटण्यात आला आहे. मात्र सध्याची असलेली हेल्पलाइन कुचकामी ठरत आहे. प्रवाशांच्या तक्रारी किंवा त्यांच्याकडून आलेली माहिती घेण्यासाठी एक रजिस्टर्ड ठेवण्यात येते. मात्र अनेक वेळा नोंद करण्यात आलेली माहिती आणि तक्रारी व्यवस्थितरीत्या संकलित करून ठेवताना नाकीनऊ येतात. सध्याच्या हेल्पलाइनचा गोंधळ पाहता एसटी महामंडळाने नवे कॉल सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला होता. एसटी महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी नवे कॉल सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार सर्व प्रक्रिया २0१५च्या एप्रिल महिन्यापासून सुरू केली. मात्र काही महिन्यांनंतर त्यांची बदली अन्यत्र झाली व नव्या कॉल सेंटरचे काम खोळंबले. एक वर्ष उलटून गेले तरीही अद्ययावत कॉल सेंटर काही उभे राहिले नाही. याबाबत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांना विचारले असता ते म्हणाले, काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ही यंत्रणा सुरू होईल. (प्रतिनिधी)>सध्याच्या हेल्पलाइनचे त्यामध्ये विलीनीकरण करण्याचा प्रयत्न एसटी करेल. आता हेल्पलाइनवर पाच लाइन असून, त्या वाढविण्यावरही भर दिला जाईल. >यापूर्वी राज्यात एसटीची दोन कॉल सेंटर्स उभारण्याचा विचार केला जात होता. आता एकच कॉल सेंटर तेही खासगी कंपन्यांच्या कॉल सेंटरप्रमाणेच उभारण्यात येणार आहे. तिथे तक्रारी, सूचना आणि माहिती घेतल्यानंतर तत्काळ समस्या सोडविण्यात येतील. यासाठी राज्यातील एसटी कार्यालयांना हे कॉल सेंटर जोडण्यात येणार आहे.
नव्या २४ तास कॉल सेंटरची प्रतीक्षा
By admin | Published: August 06, 2016 5:23 AM