मुंबई : ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीला सध्या प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागत आहे. शालेय सुट्यांचा मौसम असतानाही एसटीचे भारमान अजूनही घटलेलेच आहे. त्यामुळे एसटी महामंडळच सध्या ‘वेटिंग’वर आहे.एसटी महामंडळाच्या जवळपास १७ हजार बसेस असून, यातून दरवर्षी ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. सुटीच्या हंगामात तर एसटीच्या गाड्या भरभरून वाहत असतात. यंदा मात्र गर्दीच्या हंगामातही एसटीला प्रवाशांची प्रतीक्षाच करावी लागत आहे. एसटी महामंडळाकडून उन्हाळी हंगामासाठी १ एप्रिलपासून ६८६ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी एसटीकडून ६१४ बसचे नियोजन करण्यात आले होते. मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर प्रदेशातून या जादा बसेस सोडण्यात येत आहेत. असे असूनही एसटीचे भारमान वाढलेले नाही. २१ ते ३0 एप्रिलदरम्यान एसटीचे भारमान हे ५८ टक्के आहे, तर २१ एप्रिलपूर्वी हेच भारमान ५४ टक्क्यांपर्यंत होते. मागील वर्षीच्या २१ एप्रिल ते ३0 एप्रिलदरम्यान एसटीचे भारमान हे ६0 टक्के होते. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा परिसरात पडलेल्या दुष्काळामुळे एसटीला या भागात प्रवासी मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. दुष्काळामुळे येथील नागरिकांनी अन्य ठिकाणी न जाता आपल्याच भागात राहणे पसंत केले आहे. तसेच खासगी बससेवांचे असलेले कमी भाडे यामुळेही एसटीकडे न जाता प्रवाशांनी खासगी बसचा आधार घेतल्यानेही भारमान न वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
एसटीला प्रवाशांची प्रतीक्षा
By admin | Published: May 02, 2015 1:46 AM