मुंबई : आम्हाला कधी जेलमध्ये टाकले जाते याचीच आम्ही वाट पहात आहोत, अशा खोचक शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या माध्यमातून सरकारने माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. माध्यमांना चुकीची आणि अवास्तव माहिती दिली जात आहे, हे चांगल्या तपासाचे लक्षण नाही, असेही पवार म्हणाले.माजी मंत्री भुजबळ यांच्यावर एसीबीने कारवाई सुरू केल्यापासून राष्ट्रवादी पक्षाचे नेते त्यांच्यापासून अंतर राखून आहेत. स्वत: पवारांनी त्यांची पाठराखण केलेली नाही. त्यामुळे भुजबळ कमालीचे नाराज असल्याची चर्चा होती. गेले काही दिवस पवार एमसीएच्या निवडणुकीत व्यस्त होते. त्यामुळे भुजबळांनी गुरुवारी पवारांची भेट घेऊन एसीबीच्या कारवाईबाबतची सविस्तर माहिती दिली. उभयतांमध्ये तबब्ल दोन-अडीच तास चर्चा झाल्याचे कळते. त्यानंतर भुजबळप्रकरणी पवारांनी माध्यम प्रतिनिधीसमोर आपले मौन सोडले.पवार म्हणाले, मी मंत्रिमंडळात काम केलेले आहे. कॅबिनेट सब कमिटीला मंत्रिमंडळाचे सर्व अधिकार असतात. त्यामुळे ती सामुदायिक जबाबदारी असते. या समितीने घेतलेला निर्णय हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा असतो. त्यामुळे त्याला एकटे भूजबळ कसे, असा सवालही त्यांनी केला. मंत्रिमंडळ पायाभूत समितीने घेतलेल्या निर्णयाची चौकशी जर अधिकारी करणार असतील, तर राज्यात चुकीचे घडू लागले आहे असेच म्हणावे लागेल, असेही पवार म्हणाले. भुजबळांना लक्ष्य करताना राष्ट्रवादी पक्षदेखील कसा बदनाम होईल याचा प्रयत्न सरकारकडून केला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. लोकांमध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचे काम होत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.तर बँकांवर गुन्हे...शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास विलंब करणाऱ्या व मदत न करणाऱ्या बँकांवर सीआरपीसीनुसार गुन्हे दाखल करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. सहकार सचिवांनी राज्यातील अग्रणी बँकांची बैठक घेऊन पीककर्ज पुनर्गठण व वाटपाचे आदेश दिले आहेत. यापूर्वी जुने कर्ज नव्याने देण्यास वाव होता. नवीन योजनेत तसा वाव बँकांना राहिलेला नाही. त्यामुळे विलंब होतो आहे. राज्याच्या वाट्याचा ७०० कोटींचा निधी दिला आहे. केंद्राचा निधी मंजूर झाला आहे. पवारांनी घाबरण्याचं कारण नाही - फडणवीस औरंगाबाद : शरद पवार यांच्या विरोधात कुठलीही चौकशी सुरू नाही. त्यामुळे त्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या वक्तव्यावर औरंगाबादेत दिली. भुजबळांवरील कारवाई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू आहे. एसीबी पुराव्यांच्या आधारे काम करते. कोणावरही आकसबुद्धीने कारवाई नाही. माध्यमांमधून आमच्यावरही टीका होत असल्याने त्यांना हाताशी धरण्याचा प्रश्न येतोच कुठे, असेही म्हणाले.मोदीप्रकरणात पवारांचाही सहभाग तपासा - निरुपमआयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना बेकायदेशीररित्या साहाय्य केल्याबद्दल अडचणीत आलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची बाजू घेणाऱ्या शरद पवार यांच्यावर गुरुवारी मुंबई काँगे्रसने तोफ डागली. विशेष तपास पथक नियुक्त करून अध्यक्ष पवार यांच्या सहभागासह संपूर्ण आयपीएल घोटाळ्याची चौकशी करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.
जेलमध्ये कधी टाकतात याची वाट बघतोय!
By admin | Published: June 19, 2015 2:32 AM