मुंबई : अडीच लाखांपर्यंतच्या पीक आणि मुदत कर्जासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी वर्षभरासाठी माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पीक कर्जाबाबतच्या आढावा बैठकीत हा निर्णय झाला.१४ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून पीक कर्जाचा आढावा घेण्यात आला. पीक कर्ज वितरणाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सलग चार वर्ष दुष्काळी परिस्थिती असल्याने या आर्थिक वर्षासाठी राज्यातील सर्व प्रकारच्या पीक आणि मुदत कर्जासाठी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी माफ करण्यात आली आहे. काही दिवसांत पेरणीला सुरूवात होईल. शेतकऱ्यांना खते, बियाणे खरेदी करणे शक्य व्हावे यासाठी पीक कर्ज वाटपाच्या कामात गती आली आली पाहिजे. याकामी ज्या समस्या आहेत त्या स्थानिक पातळीवर दूर करून शेतकऱ्यांना तातडीने कर्ज कसे उपलब्ध होईल, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्यांवर आर्थिक भार न पडता सहजपणे पीक कर्ज मिळायला हवे. त्यासाठी ज्या प्रक्रिया आहेत, त्यांची संख्या कमी करावी. कर्ज पुर्नगठन करतेवेळी ‘सर्च रिपोर्ट’ संदर्भात देखील रिझर्व्ह बँकेनेनव्याने पाठविलेल्या सूचना सर्व बँकाना द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.दर आठवड्याला बँकांबरोबर बैठका घेऊन कर्ज प्रकरणे मंजुरीसाठी पाठपुरावा करावा. पीक कर्जासाठीचे उद्दिष्ट पूर्ण होईल, याकामी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मिशन मोड’मध्ये काम करावे. वेळेत कर्ज मिळाल्यास शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल. ज्या बँका कजर्पुरवठा करण्याकामी दिरंगाई करतील. त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.बऱ्याच ठिकाणी पीक कर्जाचे पुर्नगठन करताना शेतकऱ्यांच्या पीक विम्याची रक्कम बँकाकडून कापून घेण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने बँकांनी शेतकऱ्यांप्रती माणुसकी दाखवावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. (प्रतिनिधी)
पीक तसेच मुदत कर्जासाठी मुद्रांक आणि नोंदणी शुल्क माफ
By admin | Published: June 04, 2016 3:17 AM