दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीका सुरु केली आहे. यात आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचीही भर पडली आहे. केजरीवाल राजकारणात आले आणि मोठी पार्टी त्यांनी तयार केली. पंजाब दिल्ली आणि पूर्ण देशात त्यांची पार्टी आहे. घोटाळा कागदावरच असताना भाजपाला लोकसभेला भीती वाटत असल्याने केजरीवाल यांना अटक केल्याची टीका राऊत यांनी केली आहे.
तानाशाहीने राज्यांत अशी कारवाई होत आहे. एकेकाळी केजरीवालांसोबत नरेंद्र मोदी देखील भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत होते. आजची अटक ही राजकीय सूडबुद्धीने केलेली आहे. बेकायदेशीर अटक आहे. हजारो कोटी रुपयांचा घोटाळा भाजपवर शेकलेला आहे. खंडणीच्या माध्यमातून, दहशतीच्या माध्यमातून हप्ता गोळा केलेला आहे. मनी लॉन्ड्रिंगचा खटला पहिला तुमच्या अध्यक्षांवर दाखल झाला पाहिजे, असा आरोपही राऊत यांनी केला आहे.
लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवाल यांना अटक करत आहे. देशात भ्रष्ट सरकार तुमचे आहे. जे भ्रष्ट्राचार करतात त्यांना मंत्री केले जात आहे. मोदी आणि अमित शाह यांना ज्यांच्यापासून भीती आहे त्यांनाच ते अटक करू शकतात. निवडणूक हरण्याची, उठाव होण्याची त्यांना भीती आहे, यामुळे ते नेत्यांना तुरुंगात टाकत आहेत, अशी टीका राऊत यांनी मोदी, शाह यांच्यावर केली.
अण्णा हजारे यांना पहिले जागे करा, कुठे आहेत ते ? मला माहित नाही ते कुठे असतात. एकेकाळी त्यांचे आंदोलन होते अशा विषयांवर. आता हजारे कुठे हरवले आहेत ते मला माहिती नाही, असा टोलाही राऊत यांनी हजारेंना लगावला.