हडपसर : गर्दीच्या चौकातील पदपथांवर हातगाड्या पथारीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्याकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. खोदलेल्या केबल व पेव्हिंग ब्लॉकचा राडारोडा काही ठिकाणी पडलेला आहे. तर काही पदपथांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना हक्काच्या पदपथावरून चालणेही अवघड झाले आहे.हडपसर गाडीतळ, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता परिसरातील पादचारी मार्गावर अनेक ठिकाणी अर्धवट कामांचा राडारोडा पडला आहे. लोहिया उद्यान, वैभव थिएटर, आर्यन सेंटर, पीएमपी बिल्डिंग, रामानंद कॉम्प्लेक्स या भागांत अनेक दिवसांपासून कामे अर्धवट अवस्थेतच आहेत. पादचारी मार्गावर पेव्हिंग ब्लॉकचे ढीग ठेवण्यात आले आहेत. तर काही भागात वाहने उभी केली जातात. हडपसरमध्ये बऱ्याच भागात पादचारी मार्ग धोकादायक झाले आहेत. विविध भागात विकासकामांच्या माध्यमातून पादचारी मार्गाचे काम सुरू असते. काही भागात पेव्हिंग ब्लॉक तर काही भागात फरशी टाकून हा मार्ग बनविला जातो. मात्र, यावरील त्रुटी व अतिक्रमण या समस्या सोडविल्या जात नाही, ही खरी शोकांतिका आहे. पादचाऱ्यांच्या अपघाताच्या घटना व होणारा त्रास विचारात घेऊन पालिका प्रशासन, वाहतूक विभाग व स्थानिक नगरसेवकांनी परिसरातील पादचारी मार्ग पादचाऱ्यांच्या हक्काचे व्हावेत, यासाठी पुढाकार घेणे ही खरी गरज आहे.(वार्ताहर)>अतिक्रमणाचा विळखाबीआरटीचा मार्ग करताना केलेल्या सायकल ट्रॅक व फुटपाथवरही ठिकठिकाणी जुना कारबाजार, फळविक्रेते व अस्ताव्यस्त राडारोड्यामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावर येऊन चालावे लागत आहे. सायकल ट्रॅक आणि पादचारी मार्गावर झालेल्या अतिक्रमणामुळे तसेच पडलेल्या राडारोड्यामुळे या मार्गाचा वापर नागरिकांना करता येत नाही.
पदपथावरून चालणेही अवघड
By admin | Published: April 04, 2017 1:19 AM