- सचिन जवळकोटे
‘दीवार : पार्ट टू’ निर्मितीच्या स्वप्नानं झपाटलेल्या एका दिग्दर्शकाला नायकांच्या पात्रांसाठी दोन खरेखुरे भाऊच हवे होते. त्यासाठी त्यानं अनेकांची भेट घेतली. चाचपणी केली. साताऱ्याच्या राजे बंधूंची माहिती मागविली, ‘पण त्यांच्या रोजच्या भांडणात शूटिंगच्या तारखा मिळणार नाहीत,’ हे ओळखून नाद सोडला. नंतर रायगडच्या तटकरे फॅमिलीचीही भेट घेतली. ‘परंतु सध्या आपण कोणतीही डॅशिंग भूमिका साकारण्याच्या मन:स्थितीत अन् परिस्थितीत नाही,’ असं सुनीलरावांनी ‘सिंचन’च्या भिजलेल्या फायलींकडं बघत सांगितलं.त्यामुळं नाराज झालेली फिल्मी टीम पुन्हा मुंबईत परतली, तेव्हा ‘डिड यू नो?’च्या फ्लेक्सची जुगलबंदी त्यांच्या नजरेला पडली. याच ठिकाणी त्यांना दोन नायकांचा शोध लागला. ते तत्काळ ‘मातोश्री’वर पोहोचले. तिथं उद्धोजी काही डेंटिस्ट डॉक्टरांना चक्क वैद्यकीय मार्गदर्शन करत होते. विषय होता, ‘मशिनचा वापर न करता, एका झटक्यात समोरच्याचे दात कसे पाडावेत?’शेजारीच सुभाषराव अन् संजयराव गेल्या ‘पंचवीस वर्षांपासून सडलेल्या’ गव्हातले किडे बाजूला काढण्यात व्यस्त होते. सारे डॉक्टर्स निघून गेल्यानंतर दिग्दर्शकानं ‘दीवार पार्ट टू’ची कल्पना सांगितली. उद्धोजींनाही ती आवडली. मग बातचीत सुरू झाली.उद्धो : (मानभावीपणे) पण मला अॅक्ंिटग येते, हे तुम्हाला कोणी सांगितलं?दिग्दर्शक : (कौतुकानं) आता हे काय विचारणं झालं? देवेंद्र पंतांनाही तुम्ही त्यात मागं टाकलंय की...उद्धो : (खूश होत) हरकत नाही.. पण या पिक्चरची स्टोरी काय?दिग्दर्शक : तीच ती नेहमीची. दो भार्इंयोंका झगडा. बिछडना और मिलना.उद्धो : (संशयानं डोळे किलकिले करत) पण मी कोणता डॉयलॉग म्हणायचा? ‘गाडी-बंगला’वाला की ‘माँ’वाला?दिग्दर्शक : तुम्हाला जो योग्य वाटेल तो म्हणा.उद्धो : (खर्ज्या आवाजात) ठीकायऽऽ मेरे पास ‘कुर्सी’ नहीं. ‘युती’ नहीं. और अब किसीका ‘सहारा’भी नहीं.. तुम्हारे पास क्या नहीं?अॅक्ंिटग पाहून टीम खूश झाली. तिथून थेट ‘कृष्णकुंज’वर पोहोचली. आतमध्ये ‘अकेले हैऽऽ चले आओ ऽऽ कहाँ हो..’ हे गाणं स्पीकरवर आळवलं जात होतं. आत गेल्यानंतर दिग्दर्शकानं पिक्चरची पार्श्वभूमी सांगितली.. अन् अॅक्टिंग करून दाखविण्याची विनंती केली.राज : (घसा खाकरत) तुम्हारे पास ‘कुर्सी, युती और सहारा’ नहीं.. तो मेरे पास भी कोई ‘ईगो’ नहीं!(टाळ्यांचा कडकडाट. दिग्गज कलाकार मिळाले, म्हणून टीम आनंदली.)राज : (धमकी देत) पण मी सांगतो, तेच नाव पिक्चरचं हवं. नाहीतर महाराष्ट्रातल्या कोणत्याच थिएटरला झळकू देणार नाही. दिग्दर्शक : (घाबरून) तुम्ही म्हणाल तसं साहेब..राज : मग ऐका.. ‘दीवार’मधली मराठमोळ््या मुंबईची पार्श्वभूमी आमच्यासाठी नवीन नाही. त्यापेक्षा गुजरात-मध्य प्रदेश बॉर्डरच्या डोंगरावर ‘शोले पार्ट टू’ची तयारी करा. आम्ही दोघं बंधू खास मोटारसायकलवरून तिकडं येऊ. आम्हाला एकत्र बघून अमितभार्इंच्या इलाक्यात किती बॉम्ब उडतील, हेही आम्हाला पाहायचंय. चला, लागा कामाला. येऽऽ कोण आहे रे तिकडं? गाणं बदल आता. ‘ये दोस्तीऽऽ हम नहीं छोडेंगेऽऽ’ लाव..