देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सातही प्रभाग व लष्करी भागात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त आहेत. देहू-देहूरोड रस्त्यावर चिंचोली, अशोकनगर व झेंडेमळा भागात कुत्र्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. या कुत्र्यांचे निर्बीजीकरण अगर लसीकरण करून घेण्यासाठी बोर्ड प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गेली काही वर्षे बोर्ड प्रशासनाला सतावत आहे. यावर अनेकदा उपाययोजना करण्यात आल्या. मात्र तरीदेखील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच चालली आहे. बोर्डाच्या हद्दीतील चिंचोली, किन्हई, झेंडेमळा, शेलारवाडी, मामुर्डी, थॉमस कॉलनी, शितळानगर, गांधीनगर, एम. बी. कॅम्प, देहूरोड-विकासनगर रस्ता, निगडीतील दत्तनगर, देहूरोड परिसर, तसेच लष्करी भागातील अशोकनगर, विविध लष्करी आस्थापनांच्या परिसरात कुत्र्यांची संख्या भरमसाट वाढली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर आणि उघड्यावर टाकले जाणारे शिळे अन्न या कुत्र्यांना पूरक आहार ठरत आहे. गेले काही महिने या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्याने कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कॅन्टोन्मेंट भागात भटक्या कुत्र्यांची मोजणीही झालेली नाही. मात्र देहूरोड मुख्य बाजारपेठ परिसर वगळता प्रभाग एक ते सातमध्ये कुत्र्यांची संख्या लक्षणीयपणे वाढली आहे. प्राण्यांची हत्या करण्यास बंदी आहे; मात्र मोकाट आणि मानवी जीवनास धोका पोचवणाऱ्या कुत्र्यांचा नाश करण्यास आता सर्वोच्च न्यायालयाने अनुमती दिली आहे. केरळ आणि मुंबई उच्च न्यायालयाने मोकाट पण जीवितास धोका पोहोचविणाऱ्या कुत्र्यांना ठार मारण्यास अनुमती दिली होती. त्यानंतर प्राणिमात्र संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्याबाबतचा निकालही गेल्या वर्षी लागला आहे. उच्च न्यायालयाचा निकाल कायम करत सर्वोच्च न्यायालयाने पिसाळलेल्या आणि मानवी जीवितास धोका पोचवणाऱ्या कुत्र्यांना ठार मारण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांना कमी करण्यासाठी निधीची तरतूद करून उपयोजना करण्याबाबत बोर्ड प्रशासनाने विचार करण्याची वेळ आली आहे. याचबरोबर कुत्र्यांचे निर्बीजीकरणही सोपी उपाययोजना आहे. बोर्डाने तसा विचार करून कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)>रात्री फिरणे अवघड : महिलांना होतोय अधिक त्रासदेहूरोड परिसरात रात्री फिरणे किंवा वाहन चालवणे कठीण बनले आहे. विविध भागातील भटकी कुत्री रस्त्यामध्येच बसलेली असतात. यामुळे अनेकदा दुचाकीस्वारांना याचा फटका बसत आहे. सोमवारी चिंचोली येथील प्राथमिक शाळेच्या समोरील रस्त्यावर दुचाकीला भटकी कुत्री अचानक आडवी गेल्याने गावातील एक महिला जखमी झाली आहे. डोक्याला, चेहऱ्यावर व हातावर जखमा झाल्या आहेत. विशेषत: महिलांना या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला अधिक तोंड देण्याची वेळ येत आहे. मोठ्या वाहनांच्या धडकेत कुत्री मारली जातात. पण छोट्या वाहनचालकांना या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. कुत्र्यांना चुकविताना अनेकदा अपघात घडत आहेत.
भटक्या कुत्र्यांची दहशत
By admin | Published: July 21, 2016 2:09 AM