खंडाळा : घरचं अठराविश्व दारिद्र्य, अंगावर कपड्यांची वाणवा, दोन वेळा खायची भ्रांत आणि दिवसभर गावभर हिंडायची सवय अशा स्थितीत शिक्षणाचा गंधही नसणाऱ्या शिक्षणापासून वंचित असणाऱ्या पारधी समाजाच्या कुटुंबातील मुलांसाठी खंडाळा येथील ग्रामस्वराज्य युवा सेवा संस्थेने गुरुकुल बालसंस्कार वर्ग सुरू केला आहे. सामाजिक दायित्व लक्षात घेऊन या मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी संस्थेने हाती घेतलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.खंडाळा गावच्या परिसरात पारधी समाजाची अनेक कुटुंबे आहेत. याठिकाणी असलेली ० ते ४ वयोगटातील मुले शिक्षणाच्या प्रवाहापासून वर्षानुवर्षे दूरच आहेत. या समाजातील मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना योग्य वळण लागावे, शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून ग्रामस्वराज्य संस्थेचे अध्यक्ष सचिन ननावरे, संतोष देशमुख यांनी या समाजाच्या वस्तीत जाऊन त्यांच्यासाठी बालसंस्काराची शाळा सुरू केली आहे. या शाळेचे उद्घाटन इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांच्या हस्ते करण्यात आले.या मुलांना दररोज सकाळी ११ ते १ या वेळेत हा वर्ग चालविण्यात येणार असून सुप्रिया ननावरे व अनुराधा खैरमोडे या कामकाज पाहणार आहेत. वर्ग भरण्यास सुरुवात झाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. संस्थेच्या वतीने या मुलांना पहिल्या दिवशी खाऊवाटप करण्यात आले. (प्रतिनिधी) आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या या समाजातही परिवर्तन झाले पाहिजे, त्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षणातून क्रांती व्हावी, मुलांचे भवितव्य घडावे, यासाठी सामाजिक जाणिवेतून आम्ही शाळा सुरू केली आहे.- संतोष देशमुखग्रामस्वराज्य सामाजिक संस्थेने सुरू केलेल्या बालसंस्कार वर्गात २२ ते २५ मुले दाखल झाली आहेत. त्यांना शिक्षणातून परिवर्तनाकडे घेऊन जाण्यासाठी दररोज बालसंस्कार वर्ग चालविणार आहेत.- सुप्रिया ननावरे
भटक्या मुलांची पावले वळली शाळेकडे! -- गूड न्यूज
By admin | Published: October 05, 2015 11:05 PM