ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांचा अतिवेग जीवघेणा ठरत असून, या मार्गावर वेगाशी सुरू असलेली स्पर्धा अनेक अपघातांना आणि अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली आहे. काही दिवसांपूर्वी लक्झरी बस, इनोव्हा आणि स्विफ्ट कार यांच्यात भीषण अपघात होऊन १७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेक जण जखमी झाले होते.
गेल्या काही महिन्यांत या महामार्गावर अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता मुंबई-पुणे महामार्गावर अपघात ही नित्याचीच बाब झाली आहे. हे अपघात रोखण्यासाठी सरकारी यंत्रणाही कमी पडत आहेत. ते टाळण्यासाठी आपणच काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र त्यासाठी आपल्यालाही काही गोष्टी कटाक्षानं पाळाव्या लागणार आहेत. काय आहेत त्या गोष्टी जाणून घेऊ या.
या गोष्टींचे पालन करा....
- योग्य दिशेने आणि योग्य वेगमर्यादेने वाहन चालविणे ही वाहनचालकांची सर्वप्रथम जबाबदारी आहे.
- वाहन चालवताना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकाग्रता असणे आवश्यक.
- वाहन चालवत असताना कानात एअरफोन लावून गाणी ऐकत बसू नका.
- रस्त्यातील चौकात असलेल्या सिग्नलकडे दुर्लक्ष करू नका.
- डाव्या बाजूने ओव्हरटेक करू नका.
- अपवादात्मक परिस्थितीत समोरील वाहन उजव्या बाजूला वळत असेल तर डाव्या बाजूने ओव्हरटेक करा.
- वाहन चालवत असताना मोबाईल फोन अथवा गप्पा मारत वाहन चालवू नका.
- मोबाईलवर बोलायचे असल्यास वाहन रस्त्याच्या बाजूला सुरक्षितरीत्या उभे करूनच बोला.
- वाहतूक पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता वाहन वेगाने पळवून नेऊ नका, अपघात होऊ शकतो.
- वाहन चालवताना सीट बेल्ट बांधा.
- सदोष वाहन रस्त्यावर चालवणं टाळा.
मोटार वाहन कायदा -
रस्ते सुरक्षा हे ध्येय समोर ठेवून मोटार वाहन कायदा 1939 संपूर्ण देशात लागू झाला. या कायद्याने रस्ते दळणवळण यामध्ये होणारे तांत्रिक बदल, माल वाहतूक तसेच प्रवासी वाहतूक यांचे सुलभरीत्या दळणवळण, रस्त्यांचे देशभर जाळे पसरविणे आणि विकास करणे, मोटार वाहनांसंबधी असलेल्या व्यवस्थापनेमध्ये सुधारणा करणे, अशी मूळ उद्दिष्टे समोर ठेवून मोटार वाहन कायदा बनविण्यात आला आहे. महाराष्ट्रात विविध करविषयक कायदे यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरिता राज्यातील मोटार वाहन विभागाची 1 एप्रिल 1940 साली स्थापना करण्यात आली.