Ganeshotsav Confirm Railway Ticket Trick Vikalp: श्रावण पौर्णिमा, रक्षाबंधन झाले की, गोपाळकाला साजरा केला जातो. यानंतर अनेक जण गणपतीची तयारी करण्यासाठी गावी जातात. तर अनेक जण गणपतीच्या काही दिवस आधी तर काही जण आदल्या दिवशी गावच्या घरी पोहोचण्याच्या दृष्टीने तिकीटे काढत असतात. कोकण रेल्वे, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेवर शेकडो अतिरिक्त ट्रेन सेवा गणेशोत्सवाच्या निमित्ताने सोडण्यात येतात. परंतु कन्फर्म तिकीट मिळत नाही.
गणेशोत्सवात कन्फर्म तिकीट मिळणे दिवसेंदिवस अवघड बनत चालले आहे. सकाळी ८ वाजता किंवा तत्काळचे १० वाजता तिकीट बुकिंग सुरू झाल्यावर अवघ्या काही सेकंदात वेटिंग लिस्ट किंवा यादी बंद होण्याचा मेसेज दिसतो. कितीही तयारीने बसले तरी तिकीट काही मिळत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. कन्फर्म तिकीट वाढण्यासाठी काही सोपे पर्याय उपलब्ध असतात. त्याचा वापर करून पाहू शकता, असे सांगितले जाते.
भारतीय रेल्वेची पर्यायी योजना
भारतीय रेल्वेने प्रवाशांना सहजपणे निश्चित जागा मिळण्यासाठी ‘विकल्प’चा पर्याय आणला आहे. ही एक अशी सुविधा आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढवू शकता. ‘विकल्प’चा पर्याय कशा पद्धतीने काम करतो आणि तुम्ही त्याचा कसा फायदा घेऊ शकता? या योजनेत वेटिंग तिकीट ऑनलाइन बुक करताना प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी दुसऱ्या ट्रेनचा पर्याय निवडता येतो. असे केल्याने तिकीट कन्फर्म मिळण्याची शक्यता वाढते. प्रवाशांना कन्फर्म तिकिटे मिळावेत यासाठी हा पर्याय
IRCTC तिकीट बुकिंग योजनेमुळे प्रवाशांना सणासुदीच्या काळात आणि अन्य वेळेस कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता निर्माण होते. विकल्प योजनेचा अर्थ असा नाही की, तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळेलच. परंतु, या योजनेअंतर्गत आपल्या प्रवाशांना इच्छित ठिकाणी अन्य ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करता यावा आणि त्यांचा प्रवास सुनिश्चित व्हावा, यासाठी हा पर्याय रेल्वेने आणला आहे. या विकल्प पर्यायात रेल्वे आणि रिक्त जागा यांवर तिकीट कन्फर्म होणार की नाही, ते अवलंबून असते.
विकल्प पर्याय कसा वापरावा?
IRCTC ची विकल्प योजना वापरण्यासाठी IRCTC वेबसाईट वरून तिकीट बुक करताना ट्रेनमधील जागांची उपलब्धता तपासायला हवी. ट्रेनमध्ये सीट उपलब्ध नसल्यास ऑनलाईन ट्रेन तिकीट बुक करताना तुम्ही विकल्प निवडा. यानंतर IRCTC तुम्हाला तुमच्या आवडीच्या इतर ट्रेन बद्दल विचारते ज्यामध्ये तुम्ही सात ट्रेन निवडू शकता. तिकीट बुकिंग दरम्यान ऑप्शन उपलब्ध नसेल तर तुम्ही बुक केलेला तिकीट हिस्ट्रीमध्ये जाऊन तिकिटाचा पर्याय निवडू शकता. यानंतर भारतीय रेल्वे तुमच्या पसंतीच्या इतर ट्रेनमध्ये तुमच्यासाठी कन्फर्म तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करेल.